Maize Market Update : ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इतर पिकांनी साथ सोडली असताना, मक्याने मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (१६ ऑक्टोबर) तब्बल २२ हजार क्विंटल मक्याची विक्रमी आवक झाली असून, मेळघाट व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी गर्दी केली. (Maize Market Update)
दिवाळीपूर्वीचा हा बाजार शेतकऱ्यांसाठी उत्सव ठरला आहे. दर १२०० ते १३०० रुपये मिळत असले तरी, वाढलेल्या आवकेमुळे बाजार परिसरात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची रांगच लागली होती.(Maize Market Update)
यंदा ओल्या दुष्काळामुळे बहुतांश भागात सोयाबीन, तूर, कापूस यासारख्या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र या नैसर्गिक आव्हानांमध्येही मक्याने शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी उजळवली. (Maize Market Update)
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (१६ ऑक्टोबर) झालेल्या विक्रमी मक्याच्या आवकेने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.(Maize Market Update)
गुरुवारी परतवाडा शहरातील आठवडी बाजाराच्या निमित्ताने तालुक्यासह मेळघाट व शेजारच्या मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपला शेतमाल विक्रीसाठी आणला. (Maize Market Update)
पहिल्यांदाच एका दिवसात तब्बल १० हजार क्विंटल मका बाजार समितीत आला, तर आतापर्यंतची एकूण आवक २२ हजार क्विंटल इतकी विक्रमी नोंदली गेली आहे.
तरीही विक्रीला गर्दी
हंगामाच्या सुरुवातीला मक्याला प्रती क्विंटल १ हजार ८०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र सध्याच्या आवक वाढीमुळे दर १ हजार २०० ते १ हजार ३०० रुपयांवर आला आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी आपला बचावलेला मका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणला. सोयाबीनचीही सुमारे ७ हजार क्विंटल आवक झाली असून त्यालाही स्थिर दर मिळत आहेत.
दिवाळीपूर्व शेतमाल विक्रीचा उत्साह
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मजुरी, किराणा व सणासुदीच्या खरेदीसाठी शेतमाल विक्रीला आणला आहे. बुधवारी रात्रीपासूनच मध्यप्रदेश व मेळघाटातील शेतकरी खासगी वाहनांमधून बाजार समितीत पोहोचले होते. गुरुवारी पहाटेपासूनच बाजार परिसरात वाहनांची गर्दी झाली होती.
दिवाळीपूर्व शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात आणले आहेत. कुठल्याही शेतकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून संचालक मंडळ सज्ज आहे. - प्रतिभा प्रशांत ठाकरे, सभापती, अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
या विक्रमी मक्याच्या आवकेमुळे अचलपूर बाजार समितीत 'मक्याची दिवाळी' साजरी होत असून, ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा मका शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे.