Maize Market : मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबर महिन्यातील बाजारभाव पाहता, सलग तिसऱ्या वर्षी मक्याचे दर प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांच्या आसपासच अडकून पडले आहेत.(Maize Market)
उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना बाजारात मिळणारे दर मात्र स्थिर राहिल्याने, मक्याच्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे.(Maize Market)
उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये मक्याचा सरासरी बाजारभाव २ हजार १४ रुपये प्रतिक्विंटल होता. डिसेंबर २०२३ मध्ये किंचित वाढ होऊन हा दर २ हजार ८७ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला. मात्र डिसेंबर २०२४ मध्येही सरासरी बाजारभाव २ हजार ८० रुपये प्रतिक्विंटल इतकाच नोंदविण्यात आला.(Maize Market)
तीन वर्षांत बाजारभावात केवळ किरकोळ चढ-उतार झाला असून, प्रत्यक्षात दरात ठोस वाढ झालेली नाही, हे स्पष्ट होते.(Maize Market)
दुसरीकडे, केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ साठी मक्याची किमान आधारभूत किंमत (MSP) प्रतिक्विंटल २ हजार ४०० रुपये जाहीर केली आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना मिळणारे दर हमीदरापेक्षा ३०० ते ४०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत बियाणे, रासायनिक व सेंद्रिय खते, कीटकनाशके, मजुरी, डिझेल, वीज आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे.
मात्र, या वाढत्या खर्चाच्या तुलनेत मक्याच्या बाजारभावात अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण जात असून, नफा मिळणे तर दूरची गोष्ट ठरत आहे.
विशेषतः पश्चिम विदर्भातील बुलढाणा, खामगाव, वरूड, तसेच मराठवाड्यातील जालना, नाशिक विभागातील येवला यांसारख्या भागांत मका हे प्रमुख पीक आहे. मात्र दरवर्षी बाजारात मिळणाऱ्या कमी दरांमुळे या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडत चालले आहे.
बाजार समित्यांतील प्रत्यक्ष दर
सध्या विविध बाजार समित्यांमध्ये मक्याचे दर प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते १ हजार ८५० रुपयांदरम्यान असल्याचे चित्र आहे.
कळवण – १,८५१ रुपये
वरूड – १,७५० रुपये
बुलढाणा – १,६३० रुपये
खामगाव – १,५०० रुपये
जालना – १,५०० रुपये
येवला – १,६५८ रुपये
हे दर हमीदराच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
हमीदराची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
मक्याच्या शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी केवळ हमीदर जाहीर करणे पुरेसे नसून, त्या दराने प्रत्यक्ष खरेदी होणे गरजेचे आहे.
अन्यथा मका पिकावरील शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होऊन पुढील हंगामात पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
