Maize Market : जालना जिल्ह्यातील राजूर येथील खासगी मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची सरळ लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Maize Market)
एका क्विंटलमागे तब्बल २ किलोपर्यंत 'कडता' कपात, रोखीने पैसे घेतल्यास अतिरिक्त २ टक्के कपात आणि पावती न देणे अशा अनेक प्रकारांनी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे उघडकीस आले आहे. आधीच अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता खरेदी केंद्रांची ही मनमानी मोठा डोकेदुखी बनली आहे.(Maize Market)
पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने शेतकरी कष्टाने तयार झालेला उर्वरित मका खासगी केंद्रांना विकत आहेत; मात्र इथेच त्यांची प्रचंड फसगत होत आहे.(Maize Market)
क्विंटलमागे २ किलो कडता
खरेदी केंद्रावर ५५ ते ६५ किलोच्या एका कट्ट्यावर तब्बल ८०० ते ८५० ग्रॅम, म्हणजेच प्रति क्विंटल १६०० ते १७०० ग्रॅम शिल्लक घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. हे 'कडता' पोत्याचे वजन असल्याचे व्यापारी सांगतात. पण प्रत्यक्षात पोत्याचे वजन फक्त ६०० ग्रॅम असते.
यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक फटका बसत असून, क्विंटलमागे १,२०० ते १,७०० रुपये मिळत असतानाही त्यांची मोठी चापट बसत आहे.
रोख पेमेंट? मग २ टक्के कपात अतिरिक्त!
शेतकऱ्याने रोख पैसे मागितले तर व्यापारी २ रुपये टक्क्यांनी अतिरिक्त कपात करतात.
धनादेश दिला तरी तो तत्काळ दिनांकाचा नसून १० दिवसांनीचा दिला जात असल्याने शेतकरी रोखीची मागणी करणे भाग पडते आणि व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात.
मूळ पावती नाही; साध्या कागदाचे 'बिल'!
बाजार समितीच्या नियमानुसार, योग्य पावती देणे बंधनकारक आहे. परंतु, राजूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना केवळ साध्या कागदावरील बिल दिले जाते.
मूळ अधिकृत पावती मागितल्यास व्यापारी नकार देत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांवर 'हमाली'चा दुहेरी बोजा
शेतापासून केंद्रापर्यंत गाडीभाड्यासह हमाली द्यावी लागतेच. त्यानंतर व्यापारी गाडीतून माल उतरवण्यासाठी पुन्हा दुसऱ्यांदा हमाली आकारतात. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आणखी भर पडते.
व्यापाऱ्यांचा प्रकार नियमबाह्य
पोत्याचे वजन ६०० ग्रॅमपेक्षा जास्त कपात नियमबाह्य आहे. एकाही व्यापाऱ्याला क्विंटलमागे २ किलो कडता घेण्याचा अधिकार नाही हा प्रकार नियमबाह्य आहे. तसेच मूळ पावती देणे बंधनकारक आहे. - संतोष ढाले, सचिव, कृउबा समिती
नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार
पावसाने मार, बाजारात मार, आणि आता व्यापाऱ्यांच्या लुटीमुळे अजून मोठा फटका बसत आहे. प्रशासन आणि बाजार समितीने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.
ही फसवणूक फक्त राजूरपुरती मर्यादित नसून राज्यातील अनेक खासगी खरेदी केंद्रांवर सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. योग्य नियंत्रण आणि तपासणी न झाल्यास हजारो मका उत्पादक शेतकरी आर्थिक खाईत कोसळणार आहेत.
