Maize Crop : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य खरीप पीक म्हणजे मका. यंदा उत्तम पावसामुळे उत्पादन मुबलक झाले असले तरी, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता आणली आहे. (Maize Crop Harvesting)
काढणीच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात एवढा चिखल झाला की मळणी यंत्रे शेतात शिरू शकली नाहीत. परिणामी हजारो एकरांवरील मका शेतातच अडकून पडला आहे.(Maize Crop Harvesting)
मळणी यंत्र शेतात शिरेना, कणस सडण्याची भीती
यंदा मागील वर्षापेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी अधिक उत्पादन होईल असा अंदाज होता. पण काढणीच्या निर्णायक क्षणी पावसाने अडथळा आणल्याने मका कोरड्या अवस्थेत साठवता आला नाही.
अनेक शेतकऱ्यांनी कणसं काढून शेतातच वाळवण्यासाठी ठेवली, मात्र पावसामुळे ती ओलसर राहिली. शेतातील चिखलामुळे सोंगणी यंत्र व ट्रॅक्टर शेतात जाऊ शकत नसल्याने प्रक्रिया ठप्प झाली आहे.
अतिपावसामुळे शेतात चिखल झाला आहे. मळणीसाठी यंत्र शेतात नेता येत नाही. दोन आठवड्यांपासून मळणी थांबली आहे. - फुलसिंग काबरे, मळणीयंत्र मालक
ओलसर मक्याला निम्मा भाव
केंद्र सरकारने २०२५-२६ साठी मक्याची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या ओलसर मक्याला ११०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळतो आहे म्हणजेच एमएसपीच्या जवळपास निम्म्या भावात विक्री सुरू आहे.
सध्या बाजारात येणारा मका ३५ ते ४० टक्के ओलसर आहे. त्यामुळे बीअर व स्टार्च फॅक्टरीकडून मागणी नाही.- कन्हैयालाल जैस्वाल, व्यापारी प्रतिनिधी
पावसामुळे बाजारात विक्री ठप्प
हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस राहील असा अंदाज दिला आहे. त्यामुळे बाजारात मक्याचे प्रमाण वाढत असून वाळवण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना ओलसर मका आणू नये असा सल्ला दिला आहे.
सध्या मका पूर्ण वाळलेला नाही. कृउबा परिसरात रस्त्यावर मका वाळविणे शक्य नाही. मका वाळवून आणल्यासच चांगला भाव मिळेल.- हरीष पवार, अडत व्यापारी
जिल्ह्यातील स्थिती
खरीप क्षेत्र – ६.५ लाख हेक्टर
मका क्षेत्र – २ लाख हेक्टर
अपेक्षित उत्पादनवाढ – ३० टक्के
सध्याचा ओलसरपणा – ३५ ते ४०%
बाजारभाव – १,१०० ते १,२५० प्रति क्विंटल (एमएसपी २,४००)
शेतकऱ्यांसाठी सूचना
* ओलसर मका बाजारात आणू नये
* वाळवून विक्रीसाठी आणल्यास दर वाढण्याची शक्यता
* हवामान खात्याचे अंदाज पाहून मळणीची वेळ ठरवावी
