Mahua Market : मागील दोन वर्षांपासून मोहफुलांच्या (Mohfule Market) उत्पादनात घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील आदिवासी पट्ट्यातील काही निवडक भागात यंदा मोहफुले आली असून आदिवासी बांधवांचे आर्थिक गणित बिघडले आहे. मात्र ज्या बांधवानी जुनी मोहफुले (Store Mahua) साठवणूक केली असेल, अशा मोहफुलांना बाजारात मागणी वाढली आहे. साधारण ५०० ते ६०० रुपये किलोपर्यंत मार्केट मिळते आहे.
वसंत ऋतूमध्ये मोहवृक्षाला मोठ्या प्रमाणात कळ्या येऊन त्यांची फुले होऊन उष्णतेमुळे जमिनीवर गळून पडतात. या मोहफूल संकलनाच्या माध्यमातून दरवर्षीच उन्हाळ्याच्या (Summer Special) दिवसात अनेक गोरगरीब कुटुंबांना जवळपास एक ते दीड महिना हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध होत असते.वाढत्या महागाईच्या काळात मोठा आधार मिळतो. मात्र, हवामान बदलामुळे मोहफुल उत्पन्नात कमालीची घट होत आहे.
मार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून मोहफुलाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. मात्र, अधूनमधून बदलणाऱ्या हवामानामुळे मोहफुलांना आवश्यक असे पोषण वातावरण मिळत नसल्यामुळे मोहफुले गळून पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही मोहफुले उत्पादन कमी असल्याचे आदिवासी बांधवानी सांगितले. मात्र मागील वर्षी वाळवून ठेवलेल्या जुन्या मोहफुलांची मागणी अधिक आहे.
बारा महिने होते साठवण
कडक उन्हात सुकविलेली मोहफुले प्लास्टिक कागदाच्या आवरणात हवाबंद डब्यात व्यवस्थित साठवून ठेवली जातात. पुढील वर्षी मोहफुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ती मोहफुले विक्रीसाठी काढली जातात. त्यांना "जुनी मोहफुले" असे संबोधले जाते. जुन्या मोहफुलांना अधिक मागणी असते. जुनी मोहफुले मोजक्याच कुटुंबाकडे साठवून ठेवली जातात. त्यामुळे जुन्या मोहफुलांसाठी अधिक किंमत मोजावी लागते.