जळगाव : लिंबू आगारापैकी एक असलेल्या भडगाव तालुक्यातील गुढे गावातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांवर यावर्षी अभूतपूर्व आर्थिक संकट ओढावले आहे. जुलैपासून लिंबाच्या भावात मोठी घसरण होत आहे. शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ पाच ते पंधरा रुपये इतकाच दर मिळत आहे.
मजुरी, वाहतूक, फवारणी, खत इत्यादी खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लिंबू शेतातच पडून आहेत. गुढे गावातून दररोज चार ते पाच ट्रक लिंबू सुरत, नाडीयाद तर तीन ते चार ट्रक हे महाराष्ट्रातील विविध शहरांत पाठवले जातात.
एक कॅरेटमागे दीडशे रुपये खर्च
लिंबू तोडण्यासाठी प्रति कॅरेट पन्नास ते साठ रुपये मजुरी, तर सुरत मार्केटपर्यंत वाहतूक शंभर रुपये एवढा खर्च येतो. खत, औषधी फवारणी यांचा खर्च वेगळाच. एका कॅरेटचा खर्च १५० ते १८० रुपये होतो. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लिंबाला ५० ते ७० रुपये किलो दर होता. सुरत बाजारात एका तीस किलोच्या कॅरेटला एक हजार ते एक हजार ४०० रुपये दर मिळत होता. यावर्षी तोच माल १०० ते ३०० रुपये कॅरेट या दरात विकला जात आहे.
गावात चार खासगी लिंबू खरेदी केंद्र
गुढे गावातील चार खासगी खरेदी दुकानांत सध्या दोन ते अकरा रुपये किलो असा दर मिळतो. स्थानिक दुकानदार लिंबू घेऊन तत्काळ पैसे देतात. मात्र, सुरतमार्गे माल पाठवला, तर तिसऱ्या दिवशी पेटी मिळते.
गुढे व परिसरात मोठ्या प्रमाणात लिंबाचे उत्पादन होते; पण त्याला योग्य दर मिळत नाही. भडगाव शेतकरी संघामार्फत शासकीय दराने लिंबू खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पावसाळा आणि हिवाळ्यात लिंबूला खूपच कमी भाव मिळतो, म्हणून गुढे येथे लिंबू प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा.
- भय्यासाहेब पुंडलिक पाटील, चेअरमन, शेतकरी संघ, भडगाव
