लातूर : सोयाबीनच्या अस्थिर दरामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी लातूर बाजार समितीने दिलासादायक पाऊल उचलले आहे. (Latur Market Committee Scheme)
सध्या सोयाबीनच्या दरातील सततच्या चढ-उतारामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. हमीभावापेक्षा दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या हातात रोकड नाही, अशा परिस्थितीत लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजना घेऊन आली आहे.(Latur Market Committee Scheme)
शनिवारी लातूर बाजार समितीच्या वतीने 'शेतमाल तारण योजना' सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपला सोयाबीन शेतमाल बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये तारण ठेवून, त्या मालाच्या ७५ टक्के रकमेपर्यंत कर्ज मिळवू शकतील. विशेष म्हणजे, हे कर्ज केवळ ६ टक्के व्याजदराने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील.(Latur Market Committee Scheme)
कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी सकाळी ११ वाजता एमआयडीसी परिसरातील बाजार समितीच्या लातूर गोडाऊन येथे आणि दुपारी १ वाजता उपबाजार पेठ, मुरुड येथे झाला आहे. या कार्यक्रमाला माजी आमदार वैजनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित राहतील. समितीकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मालाचे योग्य मूल्य मिळेपर्यंत आर्थिक आधार मिळवावा.
सध्या बाजारात सोयाबीनचे भाव अस्थिर असून, शेतकरी रोकड मिळवण्यासाठी कमी दरात विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत ही योजना शेतकऱ्यांना 'दर पडला तरी आधार मिळेल' असा दिलासा देणारी ठरणार आहे.
