जळगाव : एकेकाळी शेतकऱ्याच्य अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या केळी पिकाचे भाव कोसळल्याने शिरपूर तालुक्यातील बागायतदार मोठे आर्थिक संकटात सापडले आहेत. अवकाळी पाऊस, हवामान बदलामुळे 'करपा' रोगाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि त्यातच बाजारभावातील घसरण यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित बिघडले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १ हेक्टर केळी लागवडीसाठी रु. १.०० ते रु. १.७५ लाख इतका प्रचंड खर्च येतो. खते, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असताना, किमान रु. ३५ ते रु. ४० हजार प्रतिटन दर मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
प्रति टन केळीचा भाव २८ ते ३२ हजाराने घसरला
ऑक्टोबर महिन्यात भाव प्रतिटन रु. २८ हजार ते रु. ३२ हजार इतका खाली आला आहे. तर स्थानिक बाजारपेठेत धुळे, जळगाव येथे हा दर रु. १५ ते रु. २० हजार प्रतिटनावर पोहोचला आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, वाहतूक मार्गाचा अडथळा आणि बाजारात मोठी आवक यामुळे दरांवर परिणाम झाला, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विक्री
एकीकडे किरकोळ विक्रेते ग्राहकांना रु. ४० ते रु. ८० प्रति डझन दराने केळी विकत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात माल विकावा लागत आहे. परिणामी, शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत आहे. परिणामी आगामी केळी लागवडीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी इराणच्या बाजारात पोहोचलेली केळी यंदा कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. ऐन सणासुदीच्या काळात भाव पडल्याने शेतकरी निराश झाले आहेत. त्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. केळी पिकासाठ शासनाचे अनुदान असूनही बाजार भावाने दगा दिला.