श्यामकुमार पुरे
सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) तर्फे सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्रावरील ग्रेडर ५ डिसेंबरपासून सुटीवर गेल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील कापूस खरेदी तब्बल १० दिवसांपासून बंद आहे. (Kapus Kharedi)
याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून, हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना कमी दरात बाजारात कापूस विक्री करावी लागत आहे. परिणामी खासगी व्यापाऱ्यांची चांदी होत असल्याचे चित्र आहे. (Kapus Kharedi)
२४ नोव्हेंबरपासून सुरू होती कापूस खरेदी
सीसीआयच्या वतीने २४ नोव्हेंबरपासून सहकारी जिनिंग, भगवान बाबा जिनिंग आणि ऋषी फायबर या जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती.
हमीभाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे धाव घेतली होती. मात्र, ५ डिसेंबरपासून अचानक ग्रेडर सुटीवर गेल्याने खरेदी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाल्यानंतर खरेदी ठप्प?
हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड व फुलंब्री येथील जिनिंगवर कार्यरत ग्रेडर शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा तसेच ग्रेडरकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सभागृहात उपस्थित केला होता. त्यानंतरच ग्रेडर सुटीवर गेल्याची चर्चा असून, यामुळेच सीसीआयची खरेदी बंद पडल्याचे बोलले जात आहे.
हमीभावाऐवजी कमी दरात विक्री करण्याची वेळ
सीसीआयच्या केंद्रावर काय मिळतोय भाव
मध्यम धाग्याच्या कापसाला ७,७१० रुपये
लांब धाग्याच्या कापसाला ८,११० रुपये
असा हमीभाव मिळत आहे.
मात्र, खासगी व्यापारी 'सुपर कापूस'ला केवळ ६,००० ते ६,५०० रुपये दर देत आहेत. तरीही सीसीआय खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांकडे कापूस विकावा लागत आहे.
हमीभाव आणि बाजारभावातील मोठी तफावत
| पीक | हमीभाव (रु.) | व्यापारी खरेदी (रु.) |
|---|---|---|
| सोयाबीन | ५,३२८ | ४,१०० |
| कापूस (मध्यम धागा) | ७,७१० | ६,००० |
| कापूस (लांब धागा) | ८,८१० | ६,५०० |
| मका | २,४०० | १,७०० |
| ज्वारी | ३,६९९ | — |
| बाजरी | २,७७५ | १,२०० |
| तूर | ८,७६८ | ६,००० |
| मूग | ७,८०० | ५,००० |
हमीभाव आणि बाजारभावातील या फरकामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शेतकरी कापूस खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
सीसीआय केंद्रे बंद असल्याने अनेक शेतकरी कापूस साठवून ठेवत असून, खरेदी पुन्हा कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. काही शेतकऱ्यांना कर्जफेड व दैनंदिन गरजांसाठी कमी दरात विक्री करावी लागत आहे.
दोन दिवसांत कापूस खरेदी सुरू होणार : बाजार समिती
दरम्यान, सिल्लोड बाजार समितीने दिलासा देणारी माहिती दिली आहे.
'सीसीआय'ची कापूस खरेदी ग्रेडर सुटीवर असल्याने बंद होती. मात्र, येत्या दोन दिवसांत पर्यायी व्यवस्था करून किंवा ग्रेडरला बोलावून सहकारी जिनिंग, भगवान बाबा जिनिंग आणि ऋषी फायबर येथे कापूस खरेदी पुन्हा सुरू केली जाईल.- विश्वास पाटील, सचिव, बाजार समिती, सिल्लोड
शेतकऱ्यांची मागणी
तातडीने ग्रेडरची कायमस्वरूपी व्यवस्था करावी
कापूस खरेदी खोळंबा न करता सातत्याने सुरू ठेवावी
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करावा
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : कपास खरेदीला वेग; पैठणमध्ये १८ हजार क्विंटल खरेदी वाचा सविस्तर
