नाशिक : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो कॅरेटला चाळीस रुपये भाव, तर उन्हाळ कांदा प्रतिक्विंटल किमान भाव ६६३ रुपये इतका कमी मिळाला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव क्षेत्रास पत्र्याचे शेड नसल्याने कांद्याचे नुकसान होत आहे.
श्रीलंका, बांगलादेश व इतर देशांत भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यावर निर्यात वाढविल्याने मूल्य निर्यात कमी झाली आहे. देशांतर्गत उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. उन्हाळ कांदा चाळीतच सडून अधिकाधिक नुकसान झाले. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे.
शनिवारी उन्हाळ कांद्यास किमान भाव ६६३ रुपये प्रतिक्विंटल, कमाल भाव १११३ रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी भाव ९५० रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला. सामान्यता बाजार समितीत विक्री आलेल्या कांद्यांना किमान भावाच्या आसपासच दर मिळतो. अगदी दहा, वीस टक्के मोजक्याच नगांना कमाल भाव मिळतो.
गोरख दरगुडे या शेतकऱ्याने सांगितले की, टोमॅटो कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याने उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. अशीच जर परिस्थिती राहिली तर शेतकरी देशोधडीला लागतील. सरकारने तत्काळ उपाययोजना करावी.
वाहतूक खर्च देखील निघत नसल्याची खंत
गोल्टी कांद्यास १५० रुपये प्रतिक्विंटल किमान ६६३ रुपये प्रतिक्विंटल कमाल व सरासरी भाव ५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे भावदेखील मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले आहे. टोमॅटोच्या २० किलोंच्या कॅरेटला किमान चाळीस रुपये, तर कमाल भाव ७६ रुपये सरासरी भाव ५० रुपये इतका मिळाला. या भावात येण्या-जाण्याचा खर्च देखील सुटणे अशक्य झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे
भारतातून अमेरिका व युरोपियन देशांमध्ये कांद्याची निर्यात अत्यल्प होते. या देशांमध्ये निर्यातीसाठी कांद्याची ठराविक गुणवत्ता आवश्यक असते, शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारावर अवलंबून राहावे लागते. आणि भाव घसरणीचा दबाव वाढतो. आंतरराष्ट्रीय बाजारास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.