नाशिक : उन्हाळी कांद्याची बांगलादेशात निर्यात (Kanda Niryat) सुरू होईल व कांदा बाजारभावात (Kanda bajarbhav) तेजी येईल या आशेवर बसलेल्या कांदा उत्पादक पट्टयातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. बांगलादेशात निर्यात सुरू होऊन देखील दरामध्ये किरकोळ तेजी आली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली बाजारभावातील तेजी आली नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक (Kanda Chal) केलेल्या उन्हाळ कांद्याला चार महिने झाले असून, साठवलेला कांद्याची टिकवण क्षमता यंदाच्या दमट वातावरणामुळे संपत आली आहे. त्यामुळे भाववाढीच्या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना निर्यात सुरू होऊन देखील दरवाढ न मिळाल्याने व मोठ्या प्रमाणात कांदा सडू लागल्याने निराशा पदरी पडली आहे.
यंदा चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात लवकरच खराब होऊ लागल्याने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विक्री करीत आहेत. सध्याचा बाजारभाव पाहता विक्री केलेल्या कांद्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
शेतकऱ्यांनी केला यावर्षी मोठा खर्चमागील वर्षी परिसरात पावसाळा चांगला असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली. कांदा लागवडीसाठी उन्हाळी कांद्याचे बियाणे, दुबार टाकूनही उपयोग होत नसताना तिसऱ्यावेळेस देखील काही शेतकऱ्यांनी रोपे टाकली. त्यात लागवडीचा खर्च, खते, फवारणी, काढणी, साठवणुकीचा खर्च पाहता शेतकऱ्यांनी यावर्षी प्रचंड भागभांडवल खर्च केले होते.
शेतात चालविला रोटरऐन कांदा काढणी दरम्यान पावसात कांदा भिजला व काही शेतकऱ्यांनी काढलेला कांदा सडू लागल्याने फेकून दिला. तर काही शेतकऱ्यांचा कांदा महिनाभर शेतात भिजल्याने शेतात रोटर चालविला. ज्या शेतकऱ्यांनी कांदा सुरक्षित काढून चाळीत साठवला त्यात मे व जून महिन्यातच पाऊस झाल्याने चाळीतला कांदा दमट वातावरणाने खराब झाला. आज शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी प्रमाणात कांदा शिल्लक असताना व बांगलादेशात निर्यात सुरू झाली असताना देखील कांदा भावात पाहिजे असलेल्या प्रमाणात तेजी आली नसल्याने उत्पादक शेतकरी संकटांत सापडला आहे.
शेतकऱ्यांचा झाला हिरमोडशेतकऱ्यांना यंदा उन्हाळ कांद्याची निर्यात आज ना उद्या सुरू होईल व कांदा बाजारभावात तेजी निर्माण होईल व पदरात दोन पैसे पडतील या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांचा आजच्या घडीला हिरमोड झाला आहे. कांद्याच्या बाजारभावामध्ये कुठलीही तेजी नसून बाजारभाव केवळ दोनशे तीनशे रुपये वाढले. सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कांदा उत्पादनासाठी लावलेले भांडवलदेखील निघणार नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. आगामी काळामध्ये भांडवल कसे उभारावे हा प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला नाकारल्याचे लक्षात आल्यावर नेत्यांनी कांदा उत्पादकांना आश्वासन दिले. मात्र आता सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने कांदा पीक सडू लागले आहे. तसेच वजनात घट झाली आहे.- शांताराम जाधव, शेतकरी पिळकोस
Kanda Market : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर बाजारात कांद्याला सरासरी काय भाव मिळाला? वाचा सविस्तर