नाशिक : अनेक दिवसांपासून भारतातील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार प्रतीक्षेत असलेल्या निर्णयाची अखेर पूर्तता झाली असून शेजारील बांगलादेशने भारतातून कांदा आयातीस परवानगी दिली आहे. यामुळे देशातील कांदा उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारतातून बांगलादेशला दररोज अंदाजे १५ हजार क्विंटल कांदा निर्यात होणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी रविवार, दि.७ पासून सुरू झाली आहे. बांगलादेश प्रशासनाने दररोज ३० टन क्षमतेचे ५० आयात परवाने जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे. निर्यात पुन्हा सुरू झाल्याने कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
...तरच दर स्थिर होतील
कांदा निर्यातीवर भविष्यात कोणत्याही परिस्थितीत बंदी घातली जाऊ नये. इतर देशांनीही भारतातून कांदा आयात सुरू केल्यास देशांतर्गत दर अधिक स्थिर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परतीच्या पावसामुळे उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीनंतर दरात काहीशी वाढ झाली असली, तरी सध्या बाजारात पुन्हा मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते.
बांगलादेशच्या कांदा आयातीच्या निर्णयानंतर प्रत्येक दिवशी ३० टनाचे ५० (आयपी) म्हणजे कांदा आयात परवाने दिले जाणार आहेत. १ ऑगस्ट २०२५ मध्ये बांगलादेश मधील ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते. त्यांनाच हे आयपी परमिट मिळणार आहे. एका दिवसाला १५०० टन म्हणजे १५ हजार क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होणार आहे. त्यामुळे साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला व नवीन लाल कांद्याला बाजारभाव वाढ मिळणे अपेक्षित आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
Read More : Kanda Bajar Bhav : पुणे जिल्ह्यातील कांदा मार्केटमध्ये सरासरी काय दर मिळतोय, वाचा सविस्तर
