नाशिक : तब्बल दहा महिन्यांपासून भारतीय कांद्याच्या आयातीस परवानगी नाकारलेल्या बांगलादेशने त्यांच्या देशातील कांद्याचा स्टॉक संपताच भारताच्या कांद्याला आयातीस परवानगी दिली आहे.
शुक्रवारी (दि. ५) तेथील सरकारने याबाबतचे आदेश पारित केले. त्यामुळे आता भारतातील व विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज १५०० मेट्रिक टन कांदाबांगलादेशला रवाना होईल.
७ डिसेंबरपासून प्रत्येक दिवशी ३० टनांचे ५० (आयपी) म्हणजे कांदा आयात परवाने दिले जाणार आहे. १ ऑगस्ट २०२५ मध्ये बांगलादेशमधील ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते, त्यांनाच हे आयपी परमिट मिळणार आहे. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश असून, या देशाने दहा महिन्यापासून परवानगी नाकारल्याने कांदा चाळीतच साठून राहिला आहे.
बांगलादेशने भारताच्या कांद्याला परवानगी दिल्याने आपल्याकडील साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला व नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळेल. बाजारातील परिस्थितीनुसार ही नियंत्रित आयात प्रक्रिया पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहील. असे निर्यातदार संघटनचे विकास सिंग यांनी सांगितले.
