नाशिक : काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर समाधानकारक होते, मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. याला बांगलादेशमधील तणाव, पाकिस्तानचा नवीन कांदा कारणीभूत आहे. सद्यस्थितीत निर्यात सुरळीत असली तरी कमी प्रमाणात आहे. मात्र पुढील काही दिवस कांद्याचे दर स्थिर राहतील अशी माहिती कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी दिली.
सध्या लासलगाव मार्केट उन्हाळ कांद्याला १२०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर लाल कांद्याला १९०० रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल आहेत. महिनाभरापूर्वी बांगलादेशने आयात परवाने जरी केल्यांनतर निर्यातीला चालना मिळाली होती. मात्र पुढील दहा बारा दिवसानंतर येथे देशांतर्गत तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने कांदा निर्यातीवर परिणाम झाला. परिणामी देशांतर्गत मार्केटमध्ये देखील दर घसरले.
आता काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कांदा देखील जागतिक मार्केटमध्ये येऊ लागला आहे. यामध्ये दुबई, मलेशिया तसेच इतर आखाती देशांमध्ये हा कांदा भाव खाऊ लागला आहे. भारतीय कांद्याचे मार्केट असलेल्या बांग्लादेश आणि श्रीलंकेमध्येही या कांद्याने एंट्री केली आहे. त्यामुळे देखील भारतीय कांद्याचे दर दबावाखाली आहेत. कारण पाकिस्तानचा हा कांदा भारतीय कांद्यापेक्षा सहा ते आठ रुपयांनी स्वस्त मिळतो आहे.
बांगलादेश निर्यातीची परिस्थिती
बांग्लादेश मधील तणावाच्या परिस्थिती गाड्यांची संख्या दोनशेवर येऊन ठेपली आहे. भारतीय कांदा बांगलादेश सोबत मलेशिया, सिंगापूर येथेही निर्यात होतो आहे, मात्र गाड्यांची संख्या कमी आहे. शिवाय आयात परवाने १६ जानेवारीपर्यंत वैध असणार आहेत. यानंतर बांगलादेश काय निर्णय घेतो, हे महत्वाचे ठरणार आहे.
शिवाय येथील मुरी काटा हा स्थानिक जातीचा कांदाही बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय कांद्याची निर्यात जरी कमी झाली तरी देशांतर्गत बाजारात मात्र मागणी असणार आहे. त्यामुळे पुढील काळात आवक वाढली तरीही बाजारभाव मात्र स्थिर राहतील, अशी शक्यता आहे.
