नाशिक : कोणत्याही शेतमालाला चांगला दर न मिळाल्याने बळीराजा संकटात सापडला. नवीन वर्षात तरी शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे, चांगल्या दराच्या अपेक्षेने लागवड केलेल्या लाल कांद्याच्या दरात गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील बाजार समितीत झालेल्या घसरणीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लासलगाव समितीत दोन दिवसांत दरात घसरण
बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन आयात परवाने थांबवल्याचा थेट फटका जिल्ह्यातील कांदा बाजारपेठांना बसू लागला आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून लासलगाव कांदा बाजार समितीत गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली
आहे. गुरुवारी लासलगाव बाजारात १,२८२ वाहनातून १९ हजार ९४८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल २ हजार १०० रुपये तर सरासरी १ हजार ६७५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. शुक्रवारी १ हजार ५६ वाहनांतील कांद्याचा लिलाव झाला असून बाजारभाव ६०० ते २ हजार ५१ रुपयांपर्यंत घसरले.
पिंपळगावी बाजारात कांद्याच्या दरात चढ-उतार
शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेल्या आठ दिवसांत कांद्याच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येत आहेत. ८ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत बाजारात दाखल होणाऱ्या कांद्याच्या आवक, प्रत, दर्जा, मागणी-पुरवठ्याच्या स्थितीवर दर अवलंबून राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
८ जानेवारीला जास्तीत जास्त दर २०७५ रुपये इतका होता, तर सरासरी दर १४५० रुपये कायम राहिला. मात्र कमीत कमी दर पुन्हा २०० रुपयांपर्यंत घसरला. ९ जानेवारी रोजी देखील असेच चित्र पाहायला मिळाले. या दिवशी जास्तीत जास्त दर २०२९ रुपये, सरासरी दर १४५० रुपये, कमीत कमी दर ९०० रुपये इतका राहिला. उत्पादन खर्च निघेल का याची चिंता सतावत आहे.
...असे आहेत बाजार समित्यांतील बाजारभाव
- येवला मार्केट - कमीत कमी २०० रुपये, कमाल १६३६ रुपये, सर्वसाधारण १३५० रुपये
- लासलगाव मार्केट - कमीत कमी ७०० रुपये, कमाल २१०० रुपये, सर्वसाधारण १६७५ रुपये
- निफाड मार्केट - कमीत कमी ६०० रुपये, कमाल १७०५ रुपये, सर्वसाधारण १५५० रुपये
- अंदरसूल मार्केट - कमीत कमी २०० रुपये, कमाल १६१८ रुपये, सर्वसाधारण १४२५ रुपये
- पिंपळगाव मार्केट - कमीत कमी ९०० रुपये, कमाल २०९९ रुपये, सर्वसाधारण १४५० रुपये
