Kanda Market : 'पेरले तर उगवेल का? आणि पिकलं तर विकेल का?' हा सवाल आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसला आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत कसाबसा उभा केलेला कांदा जेव्हा बाजारात पोहोचला, तेव्हा त्याला सोन्याचा नव्हे तर अक्षरशः कवडीमोलाचा भाव मिळाला. (Kanda Market)
सांगवी काटी येथील शेतकरी साधू शिंदे यांची कहाणी कृषी व्यवस्थेतील विदारक वास्तव समोर आणते. (Kanda Market)
३२ हजारांचा खर्च… परतावा निम्माही नाही
शिंदे यांनी मोठ्या आशेने एक एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली.
एकूण खर्चाचा तपशील असा आहे.
बियाणे : ५,००० रु.
मजुरी : सुमारे ७,५०० ते ८,००० रु. (प्रति मजूर ३५० रु. दर)
गोण्या (७३ बॅग) : ३,२८५ रु. (४५ रु. प्रति गोणी)
इतर मशागत, पाणी, फवारणी, वाहतूक खर्च
एकूण मिळून सुमारे ३२,००० रु. खर्च आला.
दर कोसळले; २५ रुपयांवरून थेट २ रुपयांवर
काही दिवसांपूर्वी २५ ते ३० रुपये किलो असलेला कांदा अचानक घसरून २ ते ८ रुपयांवर आला.
मोठा कांदा : ८ रु. प्रति किलो
मध्यम कांदा : ४ ते ६ रु.
लहान कांदा : २ रु.
सोलापूर बाजारपेठेत ३५ क्विंटल (७३ बॅग) कांदा विकल्यानंतर शिंदे यांच्या हातात आलेली विक्री पट्टी पाहून धक्का बसला फक्त १८,२६२ रुपये. म्हणजेच केलेल्या खर्चाच्या निम्मी रक्कमही हाती लागली नाही.
'अश्रूंचा नफा' पदरी
घाम गाळून उभा केलेला माल कवडीमोलात विकावा लागल्याने शिंदे यांच्यावर कर्जाचे ओझे वाढण्याची वेळ आली आहे.
'ज्वारी, गहू, हरभरा यातून काही हाती लागत नाही म्हणून कांदा लावला; पण नशिबाने इथेही घात केला. आम्ही शेती करावी तरी कशी? सरकार आमच्या शेतीमालाला संरक्षण देणार आहे की नाही?' असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
व्यवस्थेचे कठोर वास्तव
कांदा उत्पादन वाढल्यावर बाजारात अचानक दर कोसळणे, हमीभावाचा अभाव, साठवणुकीची अपुरी सोय आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल होतो आहे.
उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही योग्य दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
एक एकर कांद्यातून ३५ क्विंटल उत्पादन घेऊनही खर्चाच्या निम्मी रक्कम न मिळणे, हे शेतीतील अनिश्चिततेचे ज्वलंत उदाहरण आहे.
शेतकऱ्यांच्या अशा वेदनादायी अनुभवामुळे कृषी व्यवस्थेतील धोरणात्मक बदल आणि बाजार संरक्षणाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
अधिक वाचा : Halad Market : हळदीचे दर कोसळले; आठवड्यातच 'इतक्या' रुपयांची घसरण वाचा सविस्तर
