Kanda Market : गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजारात (Onion Market) घसरण सुरू आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एकट्या मुंबई बाजाराचा विचार केला तर मागील दोन वर्षातील बाजारात कमालीची तफावत आपल्याला जाणवते आहे. यंदा आणि मागील वर्षी कांदा बाजार भाव कसे राहिले हे समजून घेऊया...
दोन वर्षातील मुंबई बाजार समितीतील कांद्याचे प्रति किलो दर पाहिले असता जानेवारी २०२४ मध्ये १४ ते २१ रुपये किलो, तर जानेवारी २०२५ मध्ये १० ते २८ रुपये किलो, फेब्रुवारी २०२४ मध्ये १५ ते २२ रुपये किलो, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये १२ ते ३३ रुपये किलो, मार्च २०२४ मध्ये ११ ते २० रुपये किलो, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ९ ते १९ रुपये किलो...
एप्रिल २०२४ मध्ये ११ ते १५ रुपये किलो, तर एप्रिल २०२५ मध्ये ०८ ते १५ रुपये किलो, मे २०२४ मध्ये १४ ते २० रुपये किलो, तर मे २०२५ मध्ये ०७ ते १६ रुपये किलो, जून २०२४ मध्ये १७ ते २५ रुपये किलो आणि जून २०२५ मध्ये ११ ते २० रुपये किलो, तर जुलै २०२४ मध्ये २४ ते ३० रुपये किलो तर यंदाच्या जुलै २०२५ मध्ये १० ते १७ रुपये किलो असे बाजार भाव आहेत.
तर सद्यस्थितीत मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत सध्या कांद्याचे सरासरी भाव क्विंटल मागे १४०० रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा ३० रुपये किलो दर आहे. साधारण याच काळात मुंबईत कांद्याचे भाव ५० च्या वर पोहोचतात.
गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव कमी जास्त आहेत. भारतातून विशेषत: महाराष्ट्रातून कांद्याची सर्वाधिक विक्री होते. त्यापैकी ३० टक्के कांदा बांगलादेशमध्ये निर्यात होतो. मात्र बांगलादेशच्या भारतातून कांदा आयात न करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
शेतकऱ्यांचे चांगलेच वांदे
बांगलादेशने भारतीय कांद्यांची आयातबंदी केल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव कमी झाल्याने साठवलेला कांदा विक्रीसाठी काढायचा की नाही, या संभ्रमात शेतकरी आहे. साठवलेला कांदा बाहेर काढला नाही, तर पावसाळ्यात कुजतोय आणि बाजार विक्रीला काढला तर कमी भावात विकावा लागतोय. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांचे चांगलेच वांदे केले आहेत.