Kanda Bajarbhav : मराठवाड्यात कांद्याच्या भावात चढ-उतार सुरू असतानाच बुधवारी (१३ नोव्हेंबर) रोजी छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये तब्बल २०० टन कांद्याची आवक (Onions Arrival) झाली. (Kanda Bajarbhav)
मात्र, भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. तर दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांकडून तब्बल दुप्पट दराने कांदा विकला जात असल्याने ग्राहकांची लूट सुरू असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Kanda Bajarbhav)
भावात घसरण
जाधववाडीतील अडत बाजारात बुधवारी कांदा २०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला गेला.
खराब प्रतीचा कांदा - २०० ते १००० रुपये प्रति क्विंटल
चांगल्या प्रतीचा कांदा – १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल (₹१५ प्रति किलो)
शहरातील रस्त्यावर १०० रुपयांत ५ किलो कांदे अशा जाहिरातींसह विक्री सुरू आहे. परंतु भाजी मंडईत डबल पत्ती गुलाबी कांद्याचा दर अजूनही ३० रुपये किलोपर्यंत टिकून आहे.
पावसाचा फटका बसल्याने ५० टक्के कांदा खराब झाला आहे.
जाधववाडी बाजार समितीत बुधवारी आलेल्या २०० टन कांद्यापैकी ५० टक्के कांदा पावसामुळे खराब झाला. कृउबाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ८५० ते १००० प्रति क्विंटल दरम्यानचा कांदा सर्वाधिक प्रमाणात विकला गेला.
नवीन कांद्याची चाहूल लागली असून, बांगलादेशकडील निर्यात बंद असल्याने भाव घसरले आहेत.- इलियास बागवान, अडत व्यापारी
हलक्या कांद्याला हॉटेल आणि विक्रेत्यांकडून मागणी
पावसाने खराब झालेल्या हलक्या प्रतीच्या कांद्याला स्थानिक हॉटेल, ढाबे आणि फास्टफूड विक्रेते यांच्याकडून मागणी आहे.
व्यापारी स्वस्त कांदा २०० ते १००० प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे कमी प्रतीच्या कांद्याला थोडाफार बाजार मिळत आहे.- हनिफ शेख, वितरक
पैठण तालुक्यातील शेतकऱ्याचा संताप
पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील शेतकरी धनंजय अजिनाथ थोरे यांनी कांद्याच्या कवडीमोल भावाने संतप्त होऊन उभ्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
थोरे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती आणि सुमारे ४० हजार रुपयांचा खर्च केला होता.
परंतु, बाजारात कांद्याला फक्त ५ किलो दर मिळत असल्याने त्यांनी उत्पादन नष्ट करण्याचा निर्णय घेतला. खतं, मजुरी, खर्च वाढला... पण भाव मिळत नाही. शेतीतून मिळणाऱ्या या तोट्याने आता जगायचं कसं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पीक आधीच उद्ध्वस्त झाले होते. आता कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांची लूट
रस्त्यावर २० रुपये किलो कांदा मिळत असला तरी ग्राहक गुणवत्ता पाहूनच कांदा घेतात. चांगल्या प्रतीच्या कांद्याला दर टिकून आहे. शहरातील भाजी मंडईत अजूनही चांगल्या प्रतीचा गुलाबी डबलपत्ती कांदा ३० प्रति किलो दराने विकला जात आहे.- संजय वाघमारे, विक्रेता
लासूर स्टेशन मार्केटमध्येही मंदी
लासूर स्टेशन येथील कांदा बाजारात बुधवारी ४११ वाहने विक्रीसाठी आली होती. मात्र, समाधानी दर मिळाला नाही. बहुतेक शेतकऱ्यांना कमी भावामुळे माल विकण्यात अडचण आली.
स्थितीचा आढावा
२०० टन कांद्याची आवकेत ५० टक्के खराब माल
दर २०० ते १, ५०० प्रति क्विंटल दरम्यान
किरकोळ भाव २० ते ३० किलो
निर्यात बंदीचा परिणाम झाल्याने भावात घसरण
शेतकऱ्यांचा तोटा वाढला, संताप उसळला
कांद्याच्या उत्पादनात वाढ आणि निर्यातबंदीमुळे बाजारात दर कोसळले आहेत. खराब हवामानामुळे उत्पादनाची गुणवत्ता घटली, त्यामुळे व्यापारी स्वस्त दराने खरेदी करत आहेत.
एकीकडे शेतकरी तोट्यात, तर दुसरीकडे किरकोळ बाजारात ग्राहकांकडून जादा दर आकारले जात आहेत. परिणामी कांद्याच्या बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
