Kanda Bajar Bhav : राज्यात सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून बाजारपेठांमध्ये दररोज हजारो क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. परंतु, भाव मात्र अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसत आहेत. (Kanda Bajar Bhav)
दरम्यान, अनेक ठिकाणी कांद्याचा साठा चाळीत पडून ओलसर झाल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी कांद्याच्या दरवाढीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.(Kanda Bajar Bhav)
राज्यातील कांद्याची आवक
राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये बुधवारी ३ लाख ३८ हजार ३८८ क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली आहे. यापैकी नाशिक बाजारात सर्वाधिक १ लाख ७८ हजार ७२८ क्विंटल कांदा दाखल झाला आहे.(Kanda Bajar Bhav)
बाजार समिती | कांदा आवक (क्विंटल) | दर (₹/क्विंटल) |
---|---|---|
नाशिक | १,७८,७२८ | २९४ ते १,३५४ |
चंद्रपूर | ४०० | १,५०० ते २,५०० |
अकोला | ४९० | ६०० ते १,६०० |
अनेक बाजारात कांद्याचे दर ३०० ते १५०० रुपयांदरम्यानच असल्याने उत्पादनखर्च आणि वाहतूकखर्च वगळता शेतकऱ्यांच्या हातात फारसा नफा राहत नाही.
चाळीतील कांदा सडण्याच्या मार्गावर
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत ओलावा शिरला आहे. त्यामुळे कांदा ओलसर होऊन कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अनेक ठिकाणी शेतकरी चाळीतून कांदा बाहेर काढून उन्हात वाळवत आहेत, मात्र हवामानातील आर्द्रता आणि थंडावा यामुळे साठवणूक कठीण बनली आहे.
कांद्याचा साठा चाळीत पडून सडत आहे. एवढ्या मेहनतीनंतर थोडेही पैसे मिळाले नाहीत तर आपली आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होईल. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून भाववाढीसाठी उपाययोजना कराव्यात. भाव वाढेपर्यंत आम्ही साठा नष्ट होऊ देणार नाही, पण संयम संपतोय. - सोपान अमलकार, शेतकरी
कृषी तज्ज्ञांच्या मते,
सध्याच्या परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात सुधारणा करण्यासाठी नियंत्रित साठा व्यवस्थापन आणि मागणी-पुरवठा संतुलन राखणे आवश्यक आहे.
शासनाने कांदा निर्यात धोरण सुलभ करावे,
खरेदी केंद्रांवर दर हमी वाढवावी,
आणि चाळीतील साठा संरक्षित राहावा यासाठी साठवण सुविधा उपलब्ध कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय?
दरवाढीसाठी शासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा
निर्यात वाढवून स्थानिक बाजारातील दबाव कमी करावा
साठवणूक व विमा योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा
राज्यात कांद्याची आवक : ३.३८ लाख क्विंटल
नाशिकमध्ये सर्वाधिक कांदा विक्री
दर : ३०० ते १५०० क्विंटलपर्यंत
चाळीत साठा ओलसर सडण्याचा धोका
शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत
हे ही वाचा सविस्तर : Shetmal Bajar Bhav : ना CCI, ना NAFED… शेतमाल थेट व्यापाऱ्यांच्या घशात?