Kadba Price : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या पद्धतीत मोठा बदल होत आहे. अतिवृष्टी, अनियमित पाऊस आणि वाढते उत्पादनखर्च यामुळे शेतकरी पारंपरिक ज्वारी-बाजरीऐवजी मका पिकाकडे वळत आहेत.(Kadba Price)
परिणामी, ज्वारी-बाजरीच्या कडब्याचा तुटवडा निर्माण झाला असून चाऱ्याच्या पेंढीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.(Kadba Price)
कडब्याचे दर ३,५०० रुपये 'प्रति शेकडा'
जिल्ह्यात सध्या कडब्याचे दर तब्बल ३,५०० रुपये प्रति शेकडापर्यंत गेले आहेत. पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी जादा खर्च करावा लागत असून दुग्धव्यवसायाचे गणित बिघडले आहे. बाहेरून कडबा मागवताना वाहतूक खर्चही वाढल्याने अडचण अधिकच वाढली आहे.
मका पिकाकडे वाढता ओढा
रब्बी हंगामात शेतकरी ज्वारी-बाजरीऐवजी मका पिकाला पसंती देत आहेत. कारणे स्पष्ट आहेत.
* अतिवृष्टीतही मका तग धरतो
* हिरवा व सकस चारा उपलब्ध
* लागवड ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरण
* सुधारित बियाणे व ठिबक सिंचनामुळे हेक्टरी उत्पादनात वाढ
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मक्याच्या उत्पादनात सातत्य राखणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास या पिकावर वाढला आहे.
मुरघासामुळे दुहेरी फायदा
मका धान्यासोबतच मुरघासासाठी (सिलेज) विक्रीयोग्य असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाची संधी मिळते.
पशुपालकांकडून मोठी मागणी असल्याने मक्याला हमी बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे ज्वारी-बाजरीच्या तुलनेत मका अधिक फायदेशीर ठरत आहे.
ज्वारी-बाजरी का मागे पडली?
हवामानाचा जास्त फटका
कापणी-मळणी प्रक्रिया किचकट व खर्चीक
पक्ष्यांचा वाढता उपद्रव
उत्पादनात अनिश्चितता
या कारणांमुळे ज्वारी-बाजरीचे क्षेत्र घटले असून कडब्याचा पुरवठा कमी झाला आहे.
वाहतूक खर्चाने वाढवली कोंडी
इंधन दरवाढीमुळे चाऱ्याच्या वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. बाहेरच्या भागातून कडबा आणताना प्रति ट्रिप अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे कडब्याचे दर आणखी चढले आहेत.
पशुपालक आर्थिक ताणात
कडब्याच्या तुटवड्यामुळे पशुपालकांना पर्याय म्हणून मक्याची कुट्टी किंवा मुरघास वापरावा लागत आहे. मात्र त्यासाठीही अतिरिक्त गुंतवणूक करावी लागत असल्याने दुग्धव्यवसायावर ताण वाढत आहे.
सध्या कडब्याचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे मका पिकाला प्राधान्य देऊन कुट्टी तयार करून विक्रीवर भर देत आहोत. - अशोक साळवे, शेतकरी
जिल्ह्यातील पिकपद्धतीतील बदलामुळे पारंपरिक ज्वारी-बाजरीची लागवड घटली आणि कडब्याचा तुटवडा निर्माण झाला.
मक्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी हंगामात ज्वारी-बाजरीचे क्षेत्र वाढते का, की मका वर्चस्व कायम ठेवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
