जळगाव : जिल्ह्यात शासकीय ज्वारी खरेदी (Jwari Kharedi) सुरु असून शासन ३३७५ रुपये प्रतिक्विंटलने ज्वारी खरेदी करीत आहे. बाजारपेठेत फक्त २ हजार ते २२०० रुपये भाव मिळत असल्यामुळे शासकीय खरेदीकडे शेतकरीवर्गाचा कल वाढला आहे; पण शासन शेतकऱ्यांकडून हेक्टरी १६ क्विंटलच ज्वारी खरेदी करीत असल्याने उर्वरित धान्य बाजारात कमी भावाने विकावे लागत आहे.
शेतकरी सहकारी संघामार्फत गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या धान्य खरेदीत ६६०० क्विंटल ज्वारी खरेदी झाली असल्याची माहिती व्यवस्थापक विकास शिसोदे व लिपिक भैया साळुंखे यांनी दिली. चाळीसगाव तालुक्याला ११ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकरी सहकारी संघाकडे तालुक्यातील ४७६ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. आजअखेर २३० शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी झाली आहे.
धान्य खरेदी केंद्रावर धान्य मोजणीचे काम संथपणे होत आहे. दीड महिना झाला तरी आपला नंबर आला नाही. खरेदी बंद होईल की काय? अशी भीती शेतकरीवर्गाला आहे. मात्र, नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे धान्य मोजले जाईल, असे आश्वासन संघाने दिले आहे. तसेच किमान २५ क्विंटल धान्याची अट ठेवली तर आणखी आर्थिक लाभ मिळू शकेल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
सर्व नोंदणी ऑनलाइन
शासनाने यावर्षी सर्व नोंदणी ऑनलाइन केली आहे. आधारकार्डची पडताळणी करून मोबाइल नंबरवर ओटीपी, तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्याचा फोटो काढूनच प्रक्रिया पूर्ण होते. ज्या दिवशी नोंदणीनुसार नंबर येईल, त्याच्या आदल्या दिवशी खरेदी केंद्रावर धान्य घेऊन येण्याबाबत मेसेज येतो. शेतकऱ्यांकडे नोंदणी तारीख, अनुक्रमांक असल्यामुळे रोजची अपडेट शेतकरी ठेवतात. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसला आहे.