जळगाव : जिल्ह्यात आंब्याला मोहर लागला असल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी कोकणातला हापूस मात्र बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्याच्या सुगंधाने फळबाजार दरवळत आहे.
आता सुरुवातीला आंब्याची आवक कमी असल्याने दर जास्त आहेत. देवगड हापूस प्रति डझनाला १७००, तर रत्नागिरी हापूस सध्या १५०० रुपयांचा भाव घेत आहे. फळांचा राजा असलेल्या आंब्याला नेहमीच ग्राहकांमध्ये पसंती असते. उन्हाळ्यात आंबा खाणे हे आरोग्यदायी असते. गेल्या वर्षापासून आंबा विक्रीच्या हंगामात वाढ झाली आहे.
पूर्वी दोन ते अडीच महिने हंगाम असायचा, आता तो साडेचार ते पाच महिन्यांचा झाला आहे. सध्या शहरातील फळबाजारात हापूस, गुलाबखस, जुनागड केसर, बेगमपल्ली या जातीचे आंबे दाखल झाले आहेत. पुढील महिन्यात आवक वाढल्यानंतर दरात घसरण होऊ शकते.
नंतर दर कमी होण्याची शक्यता
युद्धामुळे कोकणातल्या हापूसची निर्यात अडचणीची ठरली आहे. त्यामुळे हापूसचे दर यंदा कमी राहतील, हा अंदाज फोल ठरला आहे. हापूससाठी मोजकाच ग्राहक असताना त्यांच्याकडून होणाऱ्या मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे सध्या हापूस तेजीत आहे. रामनवमीसह अक्षयतृतीयेला दर कमी होतील, असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
५२ पेट्या दाखल
शहरातील तीन विक्रेत्यांकडे हापूसच्या ५२ पेट्या दाखल झाल्या आहेत. एका पेटीत ५ डझन कैऱ्यांची आवक आहे. दोन ते तीन दिवसांत परिपक्व होणारा हापूस विक्री केला जात असल्याचे विक्रेते राजेश तिवारी यांनी स्पष्ट केले.
