Hamibhav Kendra : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळावा यासाठी अखेर जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांना सुरुवात होत आहे. (Hamibhav Kendra)
मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांच्या खरेदीसाठी बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव आणि चिखली या ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. (Hamibhav Kendra)
या खरेदी प्रक्रियेला ३० नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणार असून शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात दिलासा मिळणार आहे. (Hamibhav Kendra)
बुलढाणा जिल्ह्यात सहा केंद्रांना प्रारंभ
राज्य शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०२५-२६ हंगामासाठी या केंद्रांना सुरुवात होणार आहे. जिल्हा पणन अधिकारी एस. डी. गावंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी नोंदणी करता यावी, यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
मात्र, या केंद्रांना उशिराने प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. आता केंद्र सुरू झाल्याने योग्य दराने विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे.
सिल्लोडमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू
सिल्लोड शहरात शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. आकाश ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीला नुकतीच नाफेडकडून अधिकृत परवानगी मिळाली आहे.
शासनाने जाहीर केलेला किमान आधारभूत दर ५,३२८ रुपये प्रति क्विंटल असून, त्याच दराने खरेदी केली जाणार आहे.
खरेदीसाठी सोयाबीन स्वच्छ, वाळवलेले आणि गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक आहे, असे कंपनीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
चालू वर्षातील सोयाबीनची ई-पीक नोंद असलेला डिजिटल ७/१२ व ८-अ उतारा
आधार कार्ड
राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती (मोंढा) येथील केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संचालक आकाश गौर यांनी केले आहे.
परभणीत नऊ केंद्रांवर नोंदणी सुरू
परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी सोयाबीन उत्पादकांसाठी नाफेडच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया सुरू होत आहे.
नोंदणी ३१ ऑक्टोबरपासून, तर प्रत्यक्ष खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
केंद्र शासनाने निश्चित केलेले आधारभूत किंमत किती?
मूग : ८,७६८ रु. प्रति क्विंटल
उडीद : ७,८०० रु. प्रति क्विंटल
सोयाबीन : ५,३२८ रु. प्रति क्विंटल
परभणीत जिंतूर, पूर्णा, मानवत, पाथरी, सोनपेठ, बोरी, परभणी, डारी आणि वरपड या नऊ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असून, त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा हा मुख्य उद्देश आहे. सर्व शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. - कुंडलिक शेवाळे, जिल्हा पणन अधिकारी
नोंदणी प्रक्रिया
* नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन मशीन द्वारे केली जाणार असून, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.
* नोंदणीनंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना मिळाल्यावरच माल विक्रीसाठी केंद्रावर आणावा, असे निर्देश दिले आहेत.
* शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. उशिरा का होईना, पण हमीभाव खरेदी केंद्रांमुळे
* शेतकऱ्यांच्या हातात योग्य दराचा हमीचा आधार मिळणार आहे.
