Halad Market : मराठवाड्यातील पावसाळी दिवसांमध्ये शेतकऱ्यांना हळदीच्या गाड्यांसह बाजार समितीच्या आवारात मुक्काम करावा लागत आहे. (Halad Market)
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात व्यापाऱ्यांच्या हळदीच्या थप्या पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांची विक्री प्रक्रिया अडखळली आहे. गावोगावून आलेल्या शेतकऱ्यांना आपल्या गाड्या रांगेत उभ्या करून प्रतीक्षा करावी लागत आहे. (Halad Market)
व्यापाऱ्यांचा संप आणि सणासुदीचा अडथळा
२२ ऑगस्टपासून हळद व्यापारी व अडत्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्ह्यासह इतर भागातील शेतकऱ्यांची हळद यार्डात अडकून राहिली होती. त्यानंतर सणासुदीमुळे आणि १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त यार्ड बंद राहिल्याने शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली.
आवक मोठी, मोजमाप धीमे
१८ सप्टेंबरपासून रोजच्या प्रमाणे हळदीची आवक सुरू झाली. त्या दिवशीच जवळपास अडीच हजार पोत्यांची आवक झाली. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात व्यापाऱ्यांकडून पडून असलेल्या हळदीच्या ढिगाऱ्यांमुळे मोजमापाचा वेग खूपच मंदावला.
हिंगोलीला दोन दिवस मुक्काम करूनही आमच्या हळदीचे मोजमाप सुरू झाले नाही. पावसात गाडी सांभाळून ठेवावी लागते, ही आमची खरी समस्या आहे.- गोरख कोरडे, शेतकरी
१८ सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात आवक झाली. व्यापाऱ्यांकडून पडून असलेल्या थप्यांमुळे प्रक्रिया मंदावली आहे. लवकरात लवकर संपूर्ण हळद काढून मोजमाप पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.- नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती
शेतकऱ्यांची चिंता
पावसामुळे यार्डाबाहेरील शेतकऱ्यांच्या हळदीच्या पोत्यांना ओलाव्याचा धोका आहे. गाडीमध्ये किती दिवस हळद ठेवावी? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. व्यापाऱ्यांच्या थप्प्यांमुळे विक्रीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे वेळेत मोजमाप करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीची आवक वाढली; मात्र दर मंदावलेच वाचा सविस्तर