Halad Market : हळद उत्पादनासाठी राज्यात ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Halad Market)
कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशिम येथे १९ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात हळदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. गट्ट आणि कान्डी या दोन्ही प्रकारच्या हळदीला उच्चांकी भाव मिळाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. (Halad Market)
कान्डी हळदीला १४ हजार ७०० रुपयांपर्यंत उच्चांकी दर
शुक्रवारी झालेल्या लिलावात कान्डी प्रकारच्या हळदीची चांगली आवक झाली. बाजार समितीच्या माहितीनुसार, कान्डी हळदीला किमान १२ हजार ३०० रुपये तर कमाल १४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.
रंग, चमक आणि प्रत दर्जेदार असलेल्या मालाला व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी होती. परिणामी लिलावादरम्यान व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.
गट्ट हळदीचे दरही तेजीत
गट्ट प्रकारच्या हळदीलाही बाजारात मोठी मागणी होती. गट्ट हळदीला ११ हजार ७०० ते १३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
दोन्ही प्रकारच्या हळदीची एकत्रित आवक सुमारे ४५० क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. तुलनेने मर्यादित आवक असूनही दर टिकून राहिल्याने बाजारातील तेजी स्पष्ट झाली आहे.
औषधी व निर्यात मागणीमुळे दरांना आधार
सध्या औषधी उद्योग, मसाला प्रक्रिया उद्योग तसेच निर्यात क्षेत्रातून हळदीला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. देशांतर्गत वापरासोबतच परदेशी बाजारातील मागणी वाढल्याने हळदीच्या दरांना चांगला आधार मिळत असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे. यामुळे पुढील काळातही दर्जेदार हळदीला चांगले दर मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण
खते, औषधे, मजुरी व वाहतूक खर्च वाढलेल्या पार्श्वभूमीवर हळदीला मिळणारे सध्याचे दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहेत.
आगामी दिवसांत आवक वाढली तरी चांगल्या दर्जाच्या हळदीला बाजारात मागणी राहील आणि भाव टिकून राहतील, अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वाशिम बाजार समितीतील ही दरवाढ हळद उत्पादकांसाठी आशादायी संकेत मानली जात आहे.
