Halad Market : मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख हळद बाजार मानल्या जाणाऱ्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून हळदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. (Halad Market)
सलग घसरणीनंतर अखेर दरामध्ये क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची तेजी आल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Halad Market)
दैनंदिन आवक कमी, पण दरात वाढ
संत नामदेव मार्केट यार्डात मराठवाडा आणि विदर्भातील हळद उत्पादक मोठ्या प्रमाणावर माल आणतात. मुख्य हंगामात दररोज जवळपास ४,००० ते ५,००० क्विंटल हळदीची आवक होते.
सध्या हंगाम अखेरच्या टप्प्यावर पोहोचल्याने आवक घटून १,००० ते १,५०० क्विंटल इतकी झाली आहे. आवक कमी असूनही भावात वाढ होत असल्याने बाजारपेठेत 'तेजीचे संकेत' मिळत आहेत.
मध्यंतरी भाव घसरले; शेतकऱ्यांची बिकट स्थिती
अवकाळी पाऊस, बाजारातील मंदी आणि व्यापाऱ्यांच्या खरेदीतील घट यामुळे काही दिवसांपूर्वी हळदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटामुळे कमी भावात हळद विक्री करावी लागली.
तर काहींनी भाववाढीची प्रतीक्षा करत माल ठेवून धरला होता. आता झालेल्या भाववाढीमुळे या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
लागवड खर्चाच्या तुलनेत भाव अपुरा
हळद पिकाचा उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत तीन ते चार पट जास्त आहे.
शेतकऱ्यांना हळदीला किमान १४ हजार ते १५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा असते.
परंतु हंगामात सरासरी दर अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत आहे.
या पार्श्वभूमीवर, 'उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळावा,' अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सड आणि करपाचा प्रादुर्भाव; हळद पिकाला मोठे संकट
जिल्ह्यात या वर्षी सोयाबीननंतर हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र पिक ऐन भरात असतानाच सड आणि करप रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहेत.
तरीही कीड पूर्णपणे नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
सडीचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासाठी कृषी विभागाने पिकसंरक्षणाबाबत तात्काळ मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
* हळदीला उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा
* कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करावे
* रोगप्रादुर्भावामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीसाठी शासनाने उपाययोजना जाहीर कराव्यात
हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीन मार्केटमध्ये आवक घटली; कुठे मिळाला सर्वाधिक दर?
