नाशिक : यंदाच्या शेती हंगामात वातावरणातील बदलाचा सर्वाधिक मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असून कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार युरोप व नॉन युरोप खंडात मागील वर्षाच्या तुलनेने यंदा तब्बल २३ हजार मेट्रिक टन द्राक्षमाल कमी प्रमाणात निर्यात झाला आहे.
त्यामुळे जवळपास ६०० ते ७०० कोटी रुपयांचे परकीय चलन बुडाले असून द्राक्षावर आधारित अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. पहिलेच भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू असताना चवदार द्राक्षांनी देखील शेतकऱ्यांना घाम फोडला आहे. समुद्रमार्गे कंटेनर युरोप व नॉन युरोपात रवाना होतात.
फळधारणा ४० टक्के कमी झाल्याने यंदा द्राक्षाचे भाव किलोला ७० ते ८० रुपये शेवटपर्यंत राहतील. शिवाय हंगामही तीन आठवडे लवकर संपेल, असे निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले. गतवर्षी सलग सहा महिने पडलेल्या पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसला.
जवळपास ४० टक्के उत्पादन घटले. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. नाशिकचे द्राक्ष युरोप खंडात चवीसाठी ओळखले जातात. ५ फेब्रुवारीअखेर ३२० कंटेनरद्वारे ४३०० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात युरोप व नॉन युरोप खंडात झाली होती. त्यानंतर त्यात किंचित वाढ झाली.
३१ हजार द्राक्ष बागांची नोंदणी
कृषी उपसंचालक महेश वेठेकर यांनी सांगितले की, यंदा महाराष्ट्रातून ३१ हजार द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली होती. ती गतवर्षाच्या तुलनेने कमी होती. नाशिक जिल्ह्यातील ७० टक्के तर उर्वरित महाराष्ट्रातील ३० टक्के बागांची नोंदणी झाली होती. द्राक्ष बागांमध्ये माल ४० टक्के बाहेर आला. त्यामुळे परदेशातील व्यापाऱ्यांना तसेच स्थानिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.
या देशांमध्ये निर्यात, नेदरलॅण्डमध्ये सर्वाधिक
रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलॅण्ड, पोलंड, स्वीडन, स्पेन या देशांमध्ये नाशिकची द्राक्ष निर्यात होतात. मात्र, यंदादेखील सलग आठव्या वर्षी नेदरलॅण्डमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक कंटेनर नाशिकहून मुंबईमार्गे समुद्री प्रवासाने पोहोचले आहेत. नाशिकच्या द्राक्षांना सर्वत्र पसंती असते.
अशी झाली निर्यातीत घट
- २०२४-२५ - ५९६१ कंटेनर - ८३५८७ मे.टन
- २०२५-२६ - ४१७१ कंटेनर - ६०६७७ मे. टन
१० टक्के वाटा कमी
कृषी विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा देशभरात द्राक्ष उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. तर देशातील एकूण निर्यातीमध्ये नाशिकचा वाटा २१ टक्के आहे. मात्र हा वाटा मालच कमी निघाल्याने १० टक्क्यानी घटला. जिल्ह्यात १३ तालुक्यांत ५८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली जाते. ज्यामध्ये प्रामुख्याने निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड हे प्रमुख उत्पादक तालुके आहेत.
तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटांत करा हरभरा खरेदी नोंदणी, अशी आहे रजिस्ट्रेशनची सोपी प्रक्रिया
