जळगाव : गौरी-गणपतीचा नैवेद्य यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. आरोग्यदायी असलेल्या १६ भाज्या ८० ते ११० रुपये किलो असून, अंबाडी ४० रुपये किलो, अळुच्या १० पानांची गड्डी १० रुपयाला मिळत आहे. जळगाव शहरासह तालुक्यात गौरी-गणपतीची रविवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी स्थापना करण्यात येणार आहे.
रोजच्या लागणाऱ्या भाज्यादेखील ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे मिळत असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गौरी-गणपतीची स्थापना रविवार होणार असून, गौरीपूजन सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
बाजारातील ट्रेंड बदलला
पुर्वी १६ प्रकारच्या भाज्या खरेदीकरून त्या घरी एकत्रित केल्या जायच्या अन् त्याची भाजी करून गौरीला नैवेद्य दाखविला जायचा. मात्र, आता बाजारात १६ प्रकारच्या भाज्या एकत्रित करून त्याचा वाटा दिला जातो. या एकत्रित भाज्या किलोवरही मिळत आहेत. अगदी नावापुरती भाजी हवी असल्यास लहान वाटा ५० ते ६० रुपयाला मिळत आहे.
१६ भाज्यांचे महत्त्व व सध्याचे किलोचे दर
- कारले : रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फायद्याचे आहेत. (५० रुपये किलो.)
- शेपू : शेपू भाजी पचनासाठी जुडी उत्तम असून ती आतड्यांचे आरोग्य सुधारते. (२० रुपये किलो)
- गवार : प्रथिने, फायबर आणि जीवनसत्व आणि भरपूर खजिने, मधुमेह नियंत्रित करते. (७० रुपये किलो)
- आंबटचुका : पचनासाठी उत्तम आहे. बद्धकोष्ठता कमी करते. आरोग्य सुधारते. (२० रुपये जुडी)
- पडवळ : व्हिटॅमिन ए, बी-१, बी- २, व्हिटॅमिन सी भरपूर. (८० रुपये किलो)
- भेंडी: व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात (२० रुपये किलो)
- मेथी : सांधेदुखी, मधुमेह नियंत्रित करते. पचन सुधारते (१० रुपये जुडी)
- पालक : शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित करते. त्वचा व पोटासाठी चांगली (२० रुपये जुडी)
- कोबी : यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, अँटीऑक्सिडंट्स भरपूर (२० किलो)
- बटाटा : व्हिटॅमिन सी, बी लोह, कॅल्शियम, मॅगनीज, फास्फोरस तत्व भरपूर (३० रुपये किलो)
- टोमॅटो : आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए आणि ल्युटीनचाही चांगला स्त्रोत आहे. फायबरसारखे पोषक तत्व आहे. (३० रुपये किलो)
- गंगाफळ : भाजी, रायता, सूप, हलवा अशा पदार्थात उपयोगी. पचनक्रिया सुधारते. (५० ते ६० रुपये किलो)
- गाजर : डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हाडे मजबूत करते, पचनासाठी उत्तम (७० रुपये किलो)
- अळूची पाने : व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह व इतर खजिने (१० पाने १० रुपयात)
- अंबाडी : अॅसिडिटी, बद्ध कोष्ठता आणि उलट्या कमी होतात. (२० रुपये जुडी)
या दोन दिवसांत गौरीला नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. त्यात १६ भाज्यांच्या नैवेद्याला सर्वाधिक महत्त्व आहे.