- राजू बांते
भंडारा : हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे. मात्र, शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरूच केले नाही. अल्पभूधारक शेतकरी धान पडक्या किमतीत व्यापाऱ्यांना विकत आहेत. त्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र योजना कोणाच्या भल्यासाठी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड होत असते. अनेक शेतकरी अल्पकालावधीतील धानाची रोवणी करतात. त्यामुळे धान पिकांची परिपक्वता कमी दिवसाची असते. कमी अवधीचे धान आता कापणीला आले आहेत. धान कापणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची मळणीसुद्धा केली आहे.
दिवाळीच्या उत्सवात शेतकऱ्यांकडे पैसा नव्हता. सणासुदीचा खर्च भागवण्यासाठी व इतरांचे पैसे देण्यासाठी व्यापाऱ्यांना कमी किमतीत व घाईघाईने शेतकऱ्यांनी धान व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेपासून गरीब शेतकरी दूर राहिले आहेत.
चुकारे प्रलंबित
आज किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये भंडारा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या खरेदीचे ७हजार ५२० शेतकऱ्यांचे चुकारे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.
शासनाचे धोरण संतापजनक
हलके धान पिकांच्या वाहनाचे कापणी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आधारभूत धान खरेदी केंद्र सर्व सोयी सुविधांनी सुरू व्हायला पाहिजेत. तथापि ऑक्टोबर महिना संपायला चार दिवस शिल्लक आहेत. मात्र शासनाचे धान खरेदी केंद्र सुरू होण्याचा पत्ता नाही.
धान खरेदी, पैसे उशिरा
आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान घेतले जाते. शासनाच्या धान खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाची रक्कम खूप उशिरा मिळते. त्यामुळे या धोरणाला कंटाळलेला शेतकरी व्यापाऱ्यांनाच धान विक्री करतात. सध्या दिवाळी आटोपली असली तरी धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची मनमानी सुरु आहे.
