नाशिक : जिल्हाभरात कांद्याचे दर अक्षरशः कोसळले असतानाही शेतकरी मात्र आशेने पुन्हा लागवडीकडे वळले आहेत. बाजारात पोळ कांद्याला मिळालेला 'कवडीमोल' दर पाहता शेतकरी चिंतेत आहे.
यंदा शुक्रवार दि. २८ रोजी येवला बाजारात ५ क्विंटल पोळ कांदा विक्रीस नेण्यात आला असता, व्यापाऱ्यांनी अवघा २०० रुपये क्विंटलचा दर पुकारला. चार महिने काबाडकष्ट करून कांद्याचा हातात पडलेला प्रतिक्विंटल मोबदला पाहून शेतकरी खिन्न झाला. मिळालेली ही रक्कमही वाहतूकदारालाच दिली. यंदाचा पाऊस आणि परतीचा पाऊस यामुळे शेतकरी पुरता हताश झाला आहे.
पावसामुळे मोठ्या आशेने लावलेला पोळ कांदा सडला; काही ठिकाणी तर एक एकर क्षेत्रातून अवघे ५ क्विंटल उत्पन्न हाती पडले. खर्चाच्या तुलनेत भाव मातीमोल मिळाल्याने उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून कांदा बाजारात भाव घसरत आहे.
यंदा तरी भाव चांगला मिळेल या आशेवर शेतकरी पुन्हा कांदा लागवडीच्या कामाला लागला. मागील रब्बी हंगामात उन्हाळ कांदा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सडल्याने पुरवठा घटेल आणि त्यामुळे दर वाढतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
एक एकर कांदा लागवडीचा खर्च
कांदे बी १० हजार रुपये, नांगरणी २५०० रुपये, फननी करणे ७०० रुपये, रोटरी मारणे २२०० रुपये, सारे पाडणे १५०० रुपये, वावर बांधणे ३ हजार रुपये, लागवड १२ हजार ५०० रुपये, पाणी भरणे (चार वेळा) ०५ हजार रुपये, औषध फवारणी (चार वेळा) १५ हजार रुपये, निंदणी ५ हजार रुपये, कांदे काढणे, कापणे १० हजार रुपये, वाहतुकीसाठी ०३ हजार रुपये.
परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले. मात्र शासनाने किती नुकसान झाले, हे न पाहता २०४० रुपये एकरप्रमाणे नुकसान भरपाई पाठवली. शुक्रवारी कांदे विक्रीस नेले. अवघे २०० रुपये क्विंटल भाव पुकारला. फक्त बाजारात नेण्याचा खर्च वसूल होऊन ५० रुपये उरले. हाती काही लागले नसल्याने कसे भागवायचे हा प्रश्न पडतो.
- विजय भुसाळ, शेतकरी, एरंडगाव
