Dry Fruit Market : भारत आणि पाकिस्तान (Indo-Pak War) यांच्यातील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत बाजारात सुकामेव्याच्या किमतींचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून काजू, अंजीर, बदाम, मनुका, किसमिस आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे दर प्रतिकिलो १०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. (Dry Fruit Market)
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमधून होणाऱ्या आयातीत अडथळे निर्माण झाले असून, यामुळे सुकामेवा महागला आहे. (Dry Fruit Market)
आयातीवर परिणाम, वाहतुकीचा खर्च वाढला
अफगाणिस्तान हा भारताचा एक प्रमुख सुकामेवा पुरवठादार देश असून दरवर्षी सुमारे २० हजार टन सुकामेवा भारतात येतो. सध्या दुबईमार्गे आयात करावी लागत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे.
याशिवाय, भारत-पाकिस्तान दरम्यानचा सध्या निर्माण झालेला तणाव, सीमाबंदी आणि दहशतवादी कारवाया यामुळे आयात प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर तणाव शिगेला
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेवर कडक पावले उचलली आहेत. प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. परिणामी व्यापारमार्ग बंद होऊन, आयात व निर्यातीवरही मर्यादा येत आहेत.
मसाल्यांचे दरही वाढले
सुकामेव्याबरोबरच शहाजिरे, दालचिनी आणि इतर मसाल्यांचे दरही वाढले आहेत. सध्या शहाजिरेचे दर ७५० रुपयांवरून ९५० रुपयांवर पोहोचले आहेत.
ग्राहक आणि विक्रेते दोघेही अडचणीत
वाढते दर पाहता ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाली असून, विक्रेत्यांनाही साठा कमी असल्याने विक्रीवर मर्यादा आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास पुढील आठवड्यांमध्ये दर आणखी चढू शकतात, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या बाजारात सुकामेवा विक्री कमी झाली असली तरी दर वाढले आहेत. ग्राहक देखील हवालदिल झाले आहेत. पुरवठा सुरळीत होईपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. - अमोल जैन, सुकामेवा विक्रेते
भाववाढ किती?
सुकामेवा प्रकार | मागील दर (₹/किलो) | सध्याचे दर (₹/किलो) | वाढ (₹) |
---|---|---|---|
काजू | ८४० | ९६० | १२० |
अंजीर | ७३० | ११५० | ४२० |
काळा मनुका | ४८० | ९६० | ४८० |
किसमिस (नाशिक) | ३४० | ४५० | ११० |
किसमिस (कंदारी) | २४० | ४०० | १६० |
बदाम | ७६० | ८६० | १०० |
अक्रोड | ३०० | ५५० | २५० |
जर्दाळू | ५५० | ९६० | ४१० |