- दिनेश पाठक
नाशिक : मे ते ऑक्टोबर असे सहा महिने झालेला पाऊस, अतिवृष्टी याचा फटका द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या अर्ली द्राक्षांच्या हंगामाला बसला आहे. परिणामी द्राक्षांचे दर किरकोळ बाजारात किलोला ८० रुपयांवरच असेल. तर यंदा निर्यातील ४० टक्के घट होऊन कोट्यवधींचे परकीय चलन बुडणार आहे.
गतवर्षी ४ डिसेंबर २०२४ ला १०६२ मेट्रिक टन द्राक्ष ४६ कंटेनरद्वारे युरोप खंडात समुद्रीमार्गे निर्यात झाले होते. तर यंदा ४ डिसेंबर २०२५ पर्यंत ६७९ मे.टन द्राक्ष ४६ कंटेनरद्वारे युरोप खंडात पोहोचले आहेत. ही तफावत तब्बल ३८३ मेट्रिक टन इतकी आहे. निर्यातीचा हा उतरता आलेख हंगाम संपेपर्यंत राहील, असा अंदाज आहे.
निफाड, दिंडोरी आणि नाशिक हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील ९१ टक्के द्राक्षनिर्यात नाशिक जिल्ह्यातून होत असते. मात्र यंदा तशी सकारात्मक स्थिती दिसत नाही. नाशिकच्या द्राक्षांना युरोपमध्ये मोठी मागणी आहे. अर्ली द्राक्षांची निर्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जोर पकडते.
रशियासह युरोपीय देशांकडून द्राक्षांची ऑर्डर वाढली असली तरी द्राक्ष निर्यातदार माल कमी असल्याने ऑर्डर स्वीकारत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, अवकाळी पावसाने सर्वच चित्र बदलले.
३६३३ प्लॉट बुकिंग यावर्षी कमी
युरोपीय देशांकडून या हंगामात द्राक्ष निर्यातीसाठी द्राक्षांच्या प्लॉटची बुकिंग करण्यात येते. मागील वर्षी ४ डिसेंबरअखेर नाशिक जिल्ह्यातील ५३५२ प्लॉटची बुकिंग झाली होती. यंदाच्या ४ डिसेंबर अखेर मात्र केवळ १७२९ प्लॉटची बुकिंग झाली आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने बुकिंग करताना जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातदार आस्ते कदम घेत आहे. कारण एकदा प्लॉट बुकिंग झाली की, माल पाठवावाच लागतो, अन्यथा नुकसानभरपाई संबंधित कंपन्यांना करून द्यावी लागते.
यंदाही रशियासाठी ७० टक्के निर्यात
नाशिक जिल्हा भारताची द्राक्ष राजधानी' म्हणून ओळखला जातो आणि येथील 'अर्ली' (पूर्व हंगामी) द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते, विशेषतः बागलाण तालुक्यातून निर्यातक्षम द्राक्षे परदेशात पाठवली जात आहे. ज्यात रशिया, मलेशिया, यूएई, युरोपीय देश आणि नेदरलँड्स यांसारख्या देशात नाशिकचे द्राक्ष पोहोचत आहेत. यात रशिया हा भारताचा सर्वाधिक मोठा द्राक्ष निर्यातदार देश असून सर्वाधिक ७० टक्के द्राक्षांची निर्यात डिसेंबरअखेर याच देशात होणार असल्याचे द्राक्ष निर्यातदारांनी सांगितले.
