भंडारा : बहुप्रतीक्षेनंतर प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावरून नोंदणीकरिता परवानगी दिली. जिल्ह्यातील 'अ' व 'ब' वर्गातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मर्यादा घोषित केली आहे.
तब्बल महिनाभराच्या उशिराने शेतकऱ्यांना नोंदणीची परवानगी शासन व प्रशासनाने पुरविली आहे. एक ऑक्टोबरला नोंदणी व खरेदी सुरू होणे अपेक्षित असते. मात्र, शासनाने वेळेत नोंदणीचे नियोजन न केल्याने शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला धान गरजेपोटी खासगी व्यापारात १८०० रुपयापर्यंत विकला आहे. त्यात शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ५६९ रुपयापर्यंतचे नुकसान झाले आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय आधार खरेदी केंद्रावर नोंदणी करून शासकीय आधारभूत किमतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावंतकुमार व जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी केले आहे. पावसाने फटका दिला असून बळीराजाला याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
नोंदणीकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे...
चालू हंगामाचा नोंदणी असलेला अपडेट सातबारा, गाव नमुना आठ, अद्यावत बँक पासबुक, अद्यावत मोबाईल क्रमांक, आधारकार्ड व प्रत्यक्षदर्शी हजर राहून स्वतःचा फोटो अपलोड करून अर्ज करणे. पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे.
शेतकऱ्यांची झुंबड उडणार
नोंदणीला उशीर झाल्याने शेतकरी वर्गाची जवळच्या केंद्रावर नोंदणी करिता झुंबड उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन महासंघाच्या सभासद असलेल्या संस्थांनी तत्परतेने शेतकरी नोंदणीकरिता सहकार्याची भावना ठेवीत शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना नोंदणी व विक्री करता आधारभूत केंद्राचे सहकार्य गरजेचे आहे.
त्रिसूत्रीचा वापर फायद्याचा
नोंदणी, मोजणी व भरडाई असा त्रिसूत्रीचा उपयोग झाला तर निश्चितच जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने शेतकरीवर्गाला आधारभूत खरेदी केंद्राचा लाभ मिळणे शक्य आहे. या त्रिसूत्रीमुळे वेळेची बचत होऊन शेतकरी व भातगिरणी मालकांना वेळेत न्याय मिळतो.
