अजय पाटील
जळगाव : एकीकडे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीसाठी शेतीची मशागत सुरू असताना, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कॉटनची मागणी वाढल्यामुळे कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यासह खान्देशात कापसाचे दर ८,९०० ते ९ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. २०२२ नंतर कापसाच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.
मात्र, या दरवाढीचा फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसून येत नाही. जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला असताना, कापसाच्या वाढलेल्या भावाचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना होत नाही.
ऐन हंगामात कवडीमोलाने कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी आता केवळ रिकामी गाठोडी उरली आहेत.
सध्याची जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती आगामी हंगामात राहण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे पुढील हंगामात देखील शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळू शकतो.
भाव वाढण्याची 'ग्लोबल' कारणे
न्यूयॉर्क एक्सचेंजचा 'दे धक्का':
न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमध्ये अवघ्या काही महिन्यांत कापसाचे दर ६३ सेंटवरून थेट ८७ सेंटवर पोहोचले आहेत.
युद्धाचा वणवा आणि कच्चं तेल :
अमेरिका-इराण युद्धाच्या सावटाखाली क्रूड ऑइल महागल्याने पॉलिस्टरची किंमत वाढली. त्यामुळे कपडा उद्योगाने आपला मोर्चा स्वस्त पडणाऱ्या 'कॉटन'कडे वळवला आहे.
चीनकडून मागणी वाढली :
चीनमध्ये यार्न निर्मितीसाठी पॉलिस्टरऐवजी मोठ्या प्रमाणावर कापसाचा वापर सुरू झाल्याने चीनकडून कापसाच्या जागतिक मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
शेतकरी 'आऊट', 'सीसीआय' मात्र होतेय मालामाल !
वेळ चुकली :
जेव्हा हंगाम सुरू झाला (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५), तेव्हा भाव केवळ ६,८०० ते ७,००० रुपये होते. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने याच भावात माल विकून टाकला.
रिकामी कोठारे :
आज जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील २० टक्के शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कापूस शिल्लक नाही. अनेक जिनिंग प्रेसिंग मालकांकडेही साठा संपला आहे. या दरवाढीचा फायदा शेतकरी किंवा जिनर्सला देखील होताना दिसून येत नाही.
सरकारी लॉटरी :
सीसीआयने सुरुवातीला ६८ हजार ते ८,१०० रुपये प्रतिक्विंटल भावाने १ कोटी गाठी खरेदी केल्या होत्या. आता त्यांच्याकडे असलेल्या ४५ लाख गाठी ते वाढलेल्या दराने विकत आहेत.
दरवाढीचा आलेख (प्रतिक्विंटल)
| महिना | बाजारभावाची स्थिती (प्रतिक्विंटल) |
|---|---|
| डिसेंबर | ₹६,८०० ते ₹७,२०० |
| जानेवारी | ₹७,४०० ते ₹७,५०० |
| मार्च | ₹८,२०० ते ₹८,३०० |
| मे (सध्या) | ₹८,२०० ते ₹९,००० |
जागतिक स्तरावर पॉलिस्टरच्या वाढलेल्या किमती आणि न्यूयॉर्क एक्सचेंजमधील तेजी यामुळे कापसाला अच्छे दिन आले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. त्यामुळे हे दर वाढले आहेत. चीनसह इतर निर्यातदार देशांकडून मागणी वाढल्याने, पॉलिस्टरच्या किमती वाढल्याने हे भाव वाढले आहेत. - प्रदीप जैन, संस्थापक अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन
ही तेजी तात्पुरती नसून आगामी हंगामातही कायम राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या हंगामात जरी शेतकऱ्यांनी वाढलेल्या दराचा फायदा झाला नसला, तरी आगामी हंगामात फायदा होऊ शकतो. - हर्षल नारखेडे, कापूस बाजार अभ्यासक.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : १३ दिवसांत बाजार बदलला; बिजवाई सोयाबीन दराने गाठला उच्चांक
अधिक वाचा : Wheat Market Update : शरबती गव्हाची बाजारात चलती; कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक
