जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊन, कापसाचे दर वाढले होते. आता अवघ्या १५ दिवसांत कापसाच्या दरात प्रति क्विंटल ७०० ते ९०० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे कापूस उत्पादकांसाठी यंदाची मकर संक्रांत खऱ्या अर्थाने गोड ठरली आहे. गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच कापसाचा दर ७ हजार ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
३१ डिसेंबरपर्यंत देशात कापसाचे आयात शुल्क माफ असल्याने स्थानिक बाजारात दरावर दबाव होता. मात्र, ३१ डिसेंबरपासून केंद्र सरकारने कापसावर ११ टक्के आयात शुल्क लागू केल्याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे. यामुळेच कापसाच्या दरात ही मोठी सुधारणा पाहायला मिळत असल्याचा अंदाज कॉटन बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
आयात शुल्काचा निर्णय ठरला गेमचेंजर
आयातशुल्क ११ टक्के केल्यामुळे कापसाचा दर वाढल्याचे कारण असले तरी दुसरे कारण सरकीच्या दरात झालेली वाढ हेदेखील आहे. १५ दिवसांपूर्वी ३,२०० रुपये असलेली सरकी आता ३,९०० रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, कापसाचा दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, भाव अजून वाढेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल खासगी बाजारात आणणे तात्पुरते थांबवले आहे. दुसरीकडे, बाजारभाव सीसीआयच्या हमीभावापेक्षा जास्त मिळत असल्याने सीसीआय केंद्रांवरील गर्दी कमालीची ओसरली आहे.
...अशी झाली दरवाढ
३० डिसेंबर २०२५ : आयातशुल्क माफ
केल्यामुळे कापसाचा दर ६,९०० ते ७,१०० रुपयांच्या दरम्यान स्थिर होता.
२ जानेवारी २०२६ : भारताने ३१ डिसेंबर
रोजी आयातशुल्क ११ टक्के केल्यानंतर कापसाचा दर ७,४०० ते ७,६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला होता.
१३ जानेवारी २०२६ : सद्यस्थितीत
कापसाचा दर ७,८०० ते ७,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराकडे लक्ष; दर ८ हजारांच्या पार जाणार?
कापूस बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती अशीच अनुकूल राहिली, तर कापसाचा दर लवकरच ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकेल. संक्रांतीनंतर शेतकरी आपला साठवलेला कापूस मोठ्या प्रमाणावर बाजारात आणण्याची शक्यता असून, त्यानंतर आवक वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
खान्देश जिनिंग असोसिएशनचे संचालक विनय कोठारी व जीवन बयस यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, कापसाचा बाजार कसा राहिल...? हे सांगणे आता कठीण आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती चांगली राहिली तर दर वाढू शकतो. तसेच शेतकऱ्यांकडे किती माल शिल्लक आहे, यावरदेखील दराचे गणित अवलंबून आहे.
