Tarbuj Market : टरबुजाचे पीक जोमदार आले असले, तरी बाजारपेठेत मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रतिएकर सुमारे ९० हजार रुपये खर्च करूनही व्यापाऱ्यांकडून अवघ्या ५ ते ७ रुपये दराने खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. लागवड, खते आणि मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.
शेतकरी स्वतः फिरून करताहेत विक्री
व्यापाऱ्यांकडून मिळणारा दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता स्वतः फिरून टरबूज विक्री करण्यास सुरुवात केली आहे. थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे कसाबसा उत्पादन खर्च तरी निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. येत्या काही दिवसांत लग्नसराई आणि कडक उन्हाळ्यामुळे टरबुजाला मागणी वाढून चांगला दर मिळेल, या आशेवर सध्या शेतकरी आपला माल वाचविण्यासाठी धडपडत आहेत.
वातावरणातील बदलाचा दुहेरी फटका
बाजारभावाप्रमाणेच निसर्गाचीही साथ शेतकऱ्यांना मिळत नाही. वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर परिणाम होत आहे. कधी अचानक वाढणारे तापमान तर कधी गारवा, यामुळे फळांवर डाग पडत असून, त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. उष्णतेमुळे फळांचे नुकसान होत असल्याचे कारण सांगून व्यापारीही अत्यल्प दराने खरेदी करीत आहेत.
टरबूज लागवडीसाठी प्रतिएकर ९० हजार खर्च
शेतकऱ्यांना टरबूज लागवडीसाठी प्रतिएकर ७० ते ९० हजार रुपयांचा खर्च येतो. यात नांगरणी व रोटव्हेटरसाठी ५ ते ६ हजार रुपये, शेणखत (२-३ ट्रॉली) १० ते १२ हजार रुपये, बेड पाडणे ३ ते ४ हजार रुपये, बियाणे (४००-५०० ग्रॅम) ८ ते १० हजार रुपये (जातीनुसार दर बदलतात), मल्चिंग पेपर (२५ मायक्रॉन) १२ ते १४ हजार रुपये, मजुरी (लागवड व मल्चिंग अंथरणे) ५ ते ६ हजार रुपये, बेसल डोस (रासायनिक खते) ६ ते ७ हजार रुपये, वॉटर सोल्यूबल खते (ठिबकद्वारे) १० ते १२ हजार रुपये, कीड व रोग नियंत्रण (फवारणी) १० ते १५ हजार रुपये, ठिबक सिंचन देखभाल २ ते ३ हजार रुपये आणि काढणी व वाहतूकीसाठी ५ ते ८ हजार रुपयांप्रमाणे खर्च येतो.
