नाशिक : हिमाचल प्रदेश, पंजाबातून येणारं 'चेरी' (Cherry Fruit) हे फळ लहान-मोठ्यांना नेहमीच भुरळ घालत आलं आहे. भारत-पाक (India Pak) संघर्षामुळे काश्मीरवरून येणारी चेरी उशिरा बाजारात दाखल झाली. त्याचा दरावर परिणाम झाला असून, भावात प्रचंड वाढ झाली आहे.
दररोज चार हजार बॉक्सची होते आवक
शहरात दररोज चार हजार चेरीच्या बॉक्सची आवक होते. मुंबईपर्यंत विमानाने व तेथून ट्रकद्वारे चेरी नाशिकमध्ये (Nashik Fruit Market) येते. खूप कमी प्रमाणात ते थेट जम्मू काश्मीर, हिमाचलमधून ट्रकद्वारे येते. त्यामुळे त्याच्या प्रवासाचे दिवस वाढतात.
किरकोळ बाजारात ४०० ते ६०० रुपये
किरकोळ बाजारात चेरीचे भाव ४०० ते ६०० रुपये असे आहेत. ९०० ग्रॅमचे पाकीट तयार करून ते विकले जाते. यावर्षी ५० ते ७० रुपये भाव वाढले आहेत. अनेक ग्राहकांकडून ४०० ते ५०० ग्रॅमचे चेरीचे पाकीट मागितले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेश, पठाणकोटमध्ये लागवड
हिमाचल प्रदेश आता सफरचंदशिवाय चेरी उत्पादनातही अग्रेसर ठरत आहे. तर पंजाबच्या पठाणकोटमध्ये चेरीच्या बागा फुलू लागल्या आहेत. या दोन ठिकाणाहून नाशिकच्या बाजारपेठेत चेरीची आवक वाढली आहे.
चेरीचा सिजन फक्त वर्षातून एकच महिना असतो. साधारण मेअखेरीस हे फळ बाजारात येते. भारत-पाकिस्तान युद्ध झाले त्यानंतर चेरीची आवक ठप्प झाली होती. मात्र सध्या आवक वाढली आहे.
- सुरज भागवत, फळविक्रेता
काश्मीरची चेरी गोड; युद्धामुळे यायला उशीर !
हिमाचल, पठाणकोटच्या मानाने काश्मीरची चेरी गोड आहे. त्यात मिश्र व मखमली हे दोन प्रकार चेरीचे प्रामुख्याने आहेत. त्यातही मिश्र चेरी अधिक गोड असल्याने तिला ग्राहकांकडून मागणी जास्त आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे काश्मीरची चेरी नाशिकच्या बाजारपेठेत येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे भावात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.