Gahu, Harbhara Biyane Vikri : कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (बियाणे घटक) रब्बी २०२५ हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण सुरु झाले आहे. यामध्ये गहू आणि हरभरा बियाण्यांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांना गहू आणि हरभरा बियाणे आवश्यक आहे, त्यांनी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गहू बियाणे
गव्हाचे फुले समाधान (NIAW-1944), पुसा वाणी (HI-1633), डिबीडब्लु-१६८, पिडिकेव्ही सरदार हे वाण उपलब्ध आहेत. तसेच बियाणे दरासह बॅग पुढील प्रमाणे उपलब्ध आहेत.
प्रति हेक्टरी १०० किलो बियाणे किलो आवश्यक असून प्रति क्विंटल बियाण्यामागे ५ हजार ५०० रुपये तर यावर २ हजार रुपयांचे अनुदान आहे. असे शेतकऱ्यांना ३ हजार ५०० रुपये शुल्क एका क्विंटल बियाण्यामागे द्यावे लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी अनुदानित दर हा २० किलोसाठी ७०० रुपये तर ४० किलोसाठी १४०० रुपयांना अशा पद्धतीने विक्री केली जात आहे.
हरभरा बियाणे
हरभऱ्याचे बिजी-२०२११ (पुसा मानव), पिडिकेव्ही- कनक, आरव्हीजी-२०४ फुले विश्वराज, सुपर अनेगीरी, जेजी-२४, बिजी-१०२१६ (पुसा चिकपी), विजी-३०-६२ (पुसा पार्वती), एकेजी-११०९ (पिडिकेव्ही कांचन), फुले विक्रांत/विक्रम हे वाण उपलब्ध आहेत. तसेच बियाणे दरासह बॅग पुढील प्रमाणे उपलब्ध आहेत.
हरभऱ्याच्या १०, २० आणि ३० किलोच्या बॅग उपलब्ध आहेत. तसेच प्रति हेक्टरी ६० किलो बियाणे किलो आवश्यक असून प्रति क्विंटल बियाण्यामागे ११ हजार ३०० रुपये तर यावर ५ हजार रुपयांचे अनुदान आहे. असे शेतकऱ्यांना ६ हजार ३०० रुपये शुल्क एका क्विंटल बियाण्यामागे द्यावे लागणार आहे. तसेच १० किलोसाठी ६३० रुपये, २० किलोसाठी १२६० रुपये, ३० किलो १८९० रुपये आकारले जाणार आहेत.
तरी वरील बाबींचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या महाबीज विक्रेत्यांकडे संपर्क साधावा.
निकष :
१) आवश्यक कागदपत्रे ७/१२, आधारकार्ड, अॅग्रीस्टॅक नंबर, मोबाईल नं.
२) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, लक्षांक मर्यादित.
३) प्रति शेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर पर्यंत मर्यादित.
संपर्क : संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यालय महाबीज, छत्रपती संभाजी नगर
