Bhaji Market : यंदा पावसाळ्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोबतच भाजीपाला उत्पादकांनासुद्धा त्याचा फटका सहन करावा लागला. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला व मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यामुळे सणासुदीच्या काळात जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक घटली आहे.
परिणामी, ऐन दिवाळीत पालेभाज्यांसह सर्वच भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सद्यस्थितीत कोथिंबीर, पालक, मेथी या पालेभाज्यांसह विविध प्रकारच्या भाज्यांचे दर सध्या कडाडले आहेत. मागील काही दिवसांपासून ही स्थिती शहरातील आठवडी बाजार असो की किरकोळ बाजार सर्वत्र दिसत आहे.
परजिल्ह्यातील भाज्यांची आवक सर्वाधिक
जिल्ह्यात भाजीपाला लागवड केली जात असली, तरीही सर्वच भाज्यांची लागवड केली जात नाही. यामुळे परजिल्ह्यांतील भाजीपाला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आणावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांनासुद्धा याचा फटका बसतो. स्थानिक बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा वाढताच भाजीपाल्याचे दर कोसळतात. अजून महिना-दीड महिन्यात नवीन माल बाजारात येण्याची शक्यता आहे.
कुठली भाजी कितीला?
कोथिंबीर जुडी १८० रुपये, फुलकोबी ८० रुपये, शेवगा १६० रुपये, पानकोबी ४० रुपये, कारले ८० रुपये, पालक १२० रुपये, सिमला १२० रुपये, गवार १४० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगे ४० रुपये, भेंडी ४० रुपये, चवळीशेंग ६० रुपये, काकडी ४० रुपये दर मिळतो आहे.