गेल्या हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या वसमत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा बाजारभावाने काहीसा दिलासा दिला आहे.(Banana Market)
उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारातकेळीची आवक कमी झाली असून, उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे केळीच्या दरात तेजी आली आहे. (Banana Market)
सध्या वसमत परिसरातील केळीला प्रतिक्विंटल तब्बल १ हजार ८०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Banana Market)
वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, म्हातारगाव, महागाव, परजना, खाजनापूर, पार्टी बागल, सोमठाणा आणि दाभडी या भागात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली जाते.
या भागातील अनेक शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक आधार केळी पीक असल्याने मागील हंगामातील अतिवृष्टीने त्यांचे मोठे नुकसान केले होते.
अतिवृष्टीमुळे बागांचे मोठे नुकसान
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक केळी बागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी संपूर्ण बागा उद्ध्वस्त झाल्या. परिणामी यंदा उत्पादन क्षेत्रात मोठी घट झाली आहे.
उत्पादन कमी झाल्याने बाजारात केळीची आवक मर्यादित राहिली आहे. दुसरीकडे उन्हाळ्यामुळे फळांची मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांकडून दर्जेदार केळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
१,८०० रुपयांपर्यंत दर; शेतकऱ्यांना दिलासा
सध्या वसमत परिसरातील केळीला प्रतिक्विंटल सुमारे १ हजार ८०० रुपये दर मिळत आहे. नुकसानीच्या सावटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा दर दिलासादायक ठरत आहे.
उत्पादन घटले असले तरी उपलब्ध मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
बाजारातील आवक मर्यादित राहिल्यास आगामी काळात केळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
परराज्यांत वसमतच्या केळीला मोठी मागणी
वसमत तालुक्यातील केळीचा दर्जा उत्तम असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत या केळीला मोठी मागणी आहे. सध्या येथील केळी तेलंगणा, दिल्ली, पंजाबसह विविध राज्यांमध्ये पाठविली जात आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून परदेशात जाणारी निर्यात काही प्रमाणात ठप्प झाल्याने दरात घसरण झाली होती. मात्र आता देशांतर्गत मागणी वाढल्याने बाजाराने पुन्हा उभारी घेतली आहे.
उन्हाळ्यात मागणी वाढल्याचा फायदा
उन्हाळ्यात केळीची मागणी वाढत असल्याने व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. दर्जेदार आणि चांगल्या प्रतीच्या केळीला अधिक दर मिळत असून, बाजारातील तेजी कायम राहिल्यास पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
अतिवृष्टीच्या मोठ्या संकटानंतर आता बाजारभावामुळे मिळालेला हा दिलासा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : सोयाबीन तेजीत; बीजवाईचे दर ७ हजार पार वाचा सविस्तर
