इस्माईल जहागिरदार
केळी खावी तर वसमतचीच, हे म्हणणं पुन्हा एकदा खरं ठरत आहे. वसमत तालुक्यातील दर्जेदार केळीला परदेशातून मागणी वाढली असून, यंदा इराककडून मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे. (Banana Export)
सध्या प्रति क्विंटल २ हजार रुपयांपर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे तालुक्यातील केळी उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.(Banana Export)
इराक, इराण व सौदीकडून मागणी
तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, पार्टी (बागल), खाजनापूरवाडी, सोमठाणा, परजना, दाभडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची बागायत केली जाते. यंदा इराक, इराण, सौदी अरेबिया या देशांकडून वसमतच्या केळीला मागणी नोंदवली गेली आहे.
शेतकरी संगमनाथ गुरुडे यांच्या नेहरू नगर येथील बागेतून केळीचे काही गाडे नुकतेच इराकला पाठवण्यात आले. या केळीला विक्रमी २ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे ते म्हणाले, दर्जेदार उत्पादन घेतल्याने मागणी वाढली आहे. यापुढेही अधिक दर्जेदार उत्पादन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कष्टाचे फळ
तालुक्यात अनेक शेतकरी दरवर्षी ४ ते ५ हजार रोपे लावून केळीचे उत्पन्न घेतात. व्यापारी विशाल नरवाडे यांनी सांगितले की, विदेशात पाठवण्यासाठी केळी दर्जेदार असावी लागते. व्यापारी अशाच मालाला पसंती देतात. वसमतची केळी ही परदेशात प्रसिद्ध झाली आहे. इतर शेतकऱ्यांनीही दर्जेदार उत्पादनाकडे वळावे.
विदेशात भाव; राज्यात मात्र कमीच!
शेतकऱ्यांच्या केळीला परदेशात २ हजार रुपये दर मिळत असताना महाराष्ट्रात मात्र केळीला फक्त १ हजार ४०० ते १ हजार ६०० रुपये दर मिळतो आहे. याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतमालाला राज्यातच चांगला दर मिळावा, म्हणजे परदेशात पाठवण्याची वेळ येणार नाही, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
दर्जेदार उत्पादनाची गरज
परदेशी बाजारपेठेत शेतमाल पाठवण्यासाठी उत्पादन दर्जेदार असणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतात दर्जेदार पद्धतीने बागा उभाराव्यात, असे आवाहन व्यापाऱ्यांनीही केले आहे.
दर्जेदार केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. शासनानेही शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा यासाठी स्थानिक बाजारातही योग्य दर देण्याचे धोरण तयार करावे, अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे.
शेतकरी काय सांगतात
वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी दरवर्षी इराण, इराक, सौदी अरेबिया यासह इतर देशांत जातात. विदेशात केळी पाठविण्यासाठी त्याप्रमाणे दर्जेदार असावी लागते. तरच व्यापारी केळीला पसंती देतात. दरवर्षी शेतात १५ ते १६ हजार केळीची बाग असते. इतर शेतकऱ्यांनीही दर्जेदार केळी उत्पादनाकडे वळावे. - विशाल नरवाडे, व्यापारी, पार्डी बु.
दरवर्षी चार ते पाच हजार केळी रोपांची लागवड करत आहे. यंदाही तालुक्यात चार हजार केळीची बाग आहे. दर्जेदार केळी उत्पादन घेतले असल्याने केळीला इराक देशात मागणी होत आहे. यापूर्वीही दोन गाड्या इराक देशात पाठवल्या आहेत. प्रति क्विंटल मिळणारा दोन हजार रुपयांचा भाव समाधानकारक आहे. यापेक्षाही दर्जेदार केळी उत्पादन करण्याचा प्रयत्न आहे. - संगमनाथ गुरुडे, शेतकरी