Healthy Apple : सकाळचा नाश्ता हलका आणि पौष्टिक असावा, असं म्हटलं जात. सकाळच्या नाश्त्यामध्ये सफरचंदाचा समावेश केल्यास अनेक समस्यांवर चांगला उपाय आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात. सध्या सफरचंदाचे भाव कमी झाले असून आरोग्यासाठी लाभदायी असल्याने मागणी वाढली आहे.
'सफरचंद खा, निरोगी रहा!'
तज्ज्ञांचे मत आहे की रोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीर निरोगी राहते. सफरचंदामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि अँटिऑक्सिइंटस मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात, तसेच हृदयविकार, मधुमेह यांसारख्या आजारांपासून बचाव करतात. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा मिळते, ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.
सफरचंदाचे दर घसरले!
काही महिन्यांपूर्वी प्रतिकिलो २०० ते २२० रुपये दराने विकले जाणारे सफरचंद आता फक्त ८० ते १०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. दर कमी झाल्यामुळे जळगावच्या बाजारात सफरचंदांची विक्री लक्षणीय वाढली असून फळ विक्रेत्यांचा व्यवसाय पुनः तेजीत आला आहे.
हृदयविकार व मधुमेहावर गुणकारी फळ
- सफरचंदामध्ये फ्लॅव्होनॉइडस आणि अँटिऑक्सिडेंटस मुबलक प्रमाणात असतात.
- हे घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करतात.
- तसेच, सफरचंदातील तंतुमय पदार्थ पचन सुधारतात व आतड्यांचे विकार दूर करतात.
- सफरचंदामध्ये क्चेरसेटिन नावाचा घटक असतो जो अनावश्यक कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतो.
- त्यामुळे दररोज एक सफरचंद खाल्ल्यास हृदय आणि पचन क्रिया सुधारून शरीर निरोगी राहते, असे आहारतज्ज्ञ डॉ. योगिता बावस्कर यांनी सांगितले.
