शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी मोरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. परंतु तालुक्यातील काही भागात अनेक व्यापारी, संस्था काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याचा प्रकार समोर येत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समिती आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बाजार समितीने या संदर्भात परिपत्र जारी केले आहे.
पणन संचालक यांचे ८ मे व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे ११ मे रोजी जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विना परवाना खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
