राजाराम लोंढे
कोल्हापूर : अमेरिकेने अतिरिक्त आयात शुल्क ५० वरून १८ टक्क्यांवर आणले तरी गुळाच्या दरात फारसा फरक पडणार नाही.
प्रतिकिलो १५ ते २० रुपयांचा फरक पडणार असला तरी आखाती देशांच्या तुलनेत हा दर दुप्पट राहणार आहे.
जगात सर्वाधिक आयात शुल्क अमेरिकेत असल्याने येथे ३२० रुपये किलोपर्यंत गूळ गेला होता. त्यामुळे गेल्या सहा-सात महिन्यांत निर्यातीवर त्याचा परिणाम झाला होता.
कोल्हापुरी गुळाने जगाला भुरळ घातल्याने वर्षाला सरासरी १ हजार टन गुळाची निर्यात होते. प्रामुख्याने अमेरिका, लंडन आणि आखाती देशांमध्ये कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी आहे.
त्यापैकी किमान ४०० टन गूळ अमेरिका देशात पाठविला जातो. पण अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याने तेथे गूळ भडकला होता.
तेथील किरकोळ बाजारात सरासरी ३२० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला होता. आता, अमेरिकेने आयात शुल्क ५० टक्क्यांऐवजी १८ टक्के केले आहे. त्याचा थोडा परिणाम होणार आहे.
सध्या आखाती देशात प्रतिकिलो १५० रुपये गुळाला भाव आहे. त्यामुळे अमेरिकेतील दर हे इतर देशांच्या तुलनेत दुप्पट राहणार आहे
कोल्हापूरबाजार समितीतील तुलनात्मक गुळाची आवक
तारीख - रवे (३० किलो)
३० जानेवारी २०२५ - १६ लाख १८ हजार ३२२
३० जानेवारी २०२६ - १९ लाख ६१ हजार २२९
या देशात 'कोल्हापुरी गुळा'ला मागणी
अमेरिका, इंडोनेशिया, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, चीन, इटली, सौदी अरेबिया, कोरिया, जर्मनी, मलेशिया इ.
अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याने तिथे गुळाचे दर वाढले होते. त्याचा परिणाम काही प्रमाणात निर्यातीवर झाला आहे. आता जरी आयात शुल्क कमी केले असले तरी मुळात ते जादा असल्याने दर थोडे कमी होऊ शकतात. - निमेश वेद (गूळ व्यापारी)
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
