केडगाव : अहिल्यानगरबाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत सोमवारी (दि. १६) कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे शनिवारच्या तुलनेत कांद्याचे भाव गडगडले. भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला.
नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक झाली. आवक वाढल्याने बाह्यवळण मार्गावर कांदा घेण्यासाठी आलेल्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे. गेल्या दोन-तीन लिलावांत लाल कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला होता.
नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार ८७६ इतक्या कांदा गोण्यांची आवक झाली. क्विंटलमध्ये आवक ८६ हजार २८१ कांद्याला ३ हजार ३०० इतका भाव मिळाला, अशा ४१ कांदा गोण्या होत्या.
शनिवारी (दि. १४) झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला ४ हजार १०० इतका भाव होता. सोमवारी (दि. १६) एक नंबरच्या लाल कांद्याला २ हजार ३०० ते ३ हजार इतका भाव मिळाला. शनिवारी याच कांद्याला ३ ते ३ हजार ८०० इतका भाव मिळाला होता.
सोमवारी तोच भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला, लाल कांद्याचे भाव सरासरी ३०० ते ३ हजार इतके होते. शनिवारच्या लिलावात हेच इतके होते. एकदम आवक वाढल्यानेच कांद्याचे दर शनिवारच्या तुलनेत काहीसे कमी झाले.
कांद्याचे प्रतिक्विंटल भाव
एक नंबर कांदा २३०० ते ३०००
दोन नंबर कांदा १५०० ते २३००
तीन नंबर कांदा ९०० ते १५००
चार नंबर कांदा ३०० ते ९००
अहिल्यानगर बाजार समितीच्या नेती उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक झाली. सध्या शेतकऱ्यांची नवीन लाल कांदा काढणी सुरू केली आहे. त्यात भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. - अभय भिसे, सचिव, बाजार समिती, अहिल्यानगर
जामखेड तसेच कडा वगैरे भागातील कांदा बाजार बंद होता. यामुळे तेथील शेतकरी नगरच्या नेप्ती उपबाजारात कांदा विक्रीला घेऊन आले. - नंदकुमार शिकरे, कांदा व्यापारी, उपबाजार समिती, नेप्ती