Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Bajar Bhav : अनेक वर्ष बंद पडलेले कांदा मार्केट पुन्हा सुरु; कांद्याला मिळतोय जोरदार दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:39 IST

पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नीरा येथील मुख्य बाजारात आज शनिवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा ३,२६० असा विक्रमी भाव मिळाला आहे.

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नीरा येथील मुख्य बाजारात आज शनिवारी झालेल्या लिलावामध्ये कांद्याला शेकडा ३,२६० असा विक्रमी भाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे व चांगला भाव मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना दर शनिवारी नीरा येथे भरणाऱ्या लिलावाच्या वेळी आपला कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे बंद पडलेला नीरा येथील कांदा बाजार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी या बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री झाली होती.

यावर्षी देखील आता कांद्याची आवक नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली असून नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

आज शनिवारी दुपारी एक वाजता नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पार पडले. यावेळी कांद्याला शेकडा ३ हजार ते ३ हजार २५० इतका भाव मिळाला.

अशी माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी माध्यमांना दिली आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २१० पिशवी कांद्याची आवक झाली होती. 

कांदा नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नकानीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणताना तो नायलॉनच्या पिशवीमध्ये आणू नये असे आवाहन केले आहे. त्याऐवजी पारंपरिक सुतळीची नवीन पिशवी कांद्यासाठी वापरावी. सुतळीची पिशवी वापरल्याने कांदा चांगला राहतो त्याची साल निघत नाही. त्यामुळे तो दिसायला चांगला दिसतो. याउलट नायलॉनच्या पिशवीमध्ये कांदा आणल्यास कांद्याची साल निघते.

अधिक वाचा: Hapus Market : देवगड हापूसच्या दरदिवशी ५० ते ६० पेट्या वाशी मार्केटला; कसा मिळतोय दर?

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुरंदरशेतकरीशेती