Join us

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी वाढ कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 11:13 IST

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा दर मिळाला. एका दिवसामध्ये ४५४ ट्रक कांद्याची आवक होती. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा दर मिळाला. एका दिवसामध्ये ४५४ ट्रक कांद्याची आवक होती. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाढीव दर कायम राहणार आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील विजयपूर, इंडी, आळंद, कलबुर्गी आदी भागात माल विक्रीला येत आहे. रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी आवक वाढली.

पहाटेपासून लिलावाला सुरुवात झाली. प्रत्येक व्यापाऱ्याकडे कांद्याच्या पोत्यांची थप्पी लागली होती. मागील आठवड्यात दर ७ हजारांपर्यंत गेला होता. सोमवारी त्यात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

जरी कमाल दर ७२०० रुपये मिळाला असला तरी सरासरी दर मात्र २५०० रुपयेच आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा माल सध्या कमी येत आहे. शेतकऱ्यांकडून कच्चा माल विक्रीसाठी येत असल्याने दर कमी मिळत आहे.

चांगल्या वाळलेल्या कांद्याला मात्र चांगला दर आहे. बहुतांश शेतकऱ्यांना ४००० ते ५००० हजारांपर्यंत दर मिळत आहे. डिसेंबर महिन्यात नवीन कांदा मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

सोमवारी दरामध्ये वाढ झाली आहे. ७२०० रुपयांचा दर मिळाला आहे. येणाऱ्या काळात आवक वाढण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षापासून जानेवारीमध्ये सुमारे १ हजार ट्रक आवक होत आहे. त्यामुळे बाजार समितीत एक दिवसाआड लिलाव करण्याची वेळ येते. यार्डात कोंडी होणार नाही. यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. - नामदेव शेजाळ, कांदा विभाग प्रमुख, सोलापूर

टॅग्स :कांदासोलापूरबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी