Join us

Kaju Bajar Bhav : गेल्या पाच वर्षात प्रथमच यंदा काजूला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:40 IST

जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणाऱ्या काजू (पांढरं सोनं) पिकाला गेल्या पाच वर्षात प्रथमच यावर्षी सर्वोच्च दर मिळाला आहे.

रत्नागिरी : जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणाऱ्या काजू (पांढरं सोनं) पिकाला गेल्या पाच वर्षात प्रथमच यावर्षी सर्वोच्च दर मिळाला आहे.

यावर्षी सुरुवातच १८० रुपये किलोने झाली असून, सध्या १६० ते १७० रुपये दर मिळत आहे. वाढत्या दरामुळे यावर्षी काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड आहे. आंबा लागवडीप्रमाणे काजू लागवडीसाठी बागायतदारांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत.

मात्र, योग्य खत व्यवस्थापन असल्यास उत्पादन चांगले मिळते. नैसर्गिक बदलामुळे पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादकता धोक्यात येते.

जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ६ व ७ या वाणांची लागवड केली आहे. वेंगुर्ला या वाणाची बी आकाराने मोठी असते.

शिवाय उत्पादन लवकर येते. त्यामुळे या वाणाला सर्वाधिक पसंती आहे. सुरुवातीला काजूची आवक कमी असल्याने १८० रुपये दर मिळाला होता. सध्या आवक वाढल्याने हा दर १६० ते १७० रुपये किलो इतका आहे.

गावठी काजूला दर कमीगावठी काजूचा हंगाम वेंगुर्ला काजूपेक्षा थोडा उशिरा सुरू होतो. बी आकाराने लहान असल्यामुळे दरही थोडा कमी असतो. अजूनही गावठी काजूचे प्रमाण कमी आहे. सध्या गावठी काजू १४५ ते १५० रुपये किलो आहे.

पाच वर्षातील काजूचे दर

सन दर (रुपयांत)
२०२०-२१८०
२०२१-२२१००
२०२२-२३११५
२०२३-२४१२५
२०२४-२५१८०

गेल्या पाच वर्षात प्रथमच काजूला चांगला भाव मिळाला आहे. दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादनावर केलेला खर्च भरून निघण्यास मदत होणार आहे. आंब्यापेक्षा यावर्षी काजूचे उत्पादन चांगले आहे, शिवाय काजूला दरही चांगला मिळत आहे. दर टिकून राहिले तर यामुळे गेल्या पाच वर्षातील कसर भरून काढण्यास मदत होईल. - रोहित कामेरकर, शेतकरी, रत्नागिरी

अधिक वाचा: Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार?

टॅग्स :मार्केट यार्डबाजारशेतकरीकोकणशेतीफलोत्पादनरत्नागिरीआंबा