उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून, केळीला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने कर्जफेड करणेही अवघड झाले आहे.
सध्या बाजारातकेळीला केवळ ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, बोर्ड भावाच्या तुलनेत हा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांत खत, औषधे, मजुरी, वीज बिल आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च प्रचंड वाढला आहे.
मात्र, त्यानुसार बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होत असून, अस्मानी संकटानेही शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी बँका आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन केळीची लागवड केली आहे. परंतु, सध्याच्या घसरलेल्या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. "उत्पन्नच मिळत नसेल, तर कर्ज फेडायचे कसे?" असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
शेतातच फेकले जात आहेत घड
• काही ठिकाणी तर शेतकरी केळीचे घड बाजारात नेण्याऐवजी शेतातच टाकून देत असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे.
• व्यापाऱ्यांकडून मनमानी दर लावले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून प्रभावी नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
• बाजार व्यवस्थेत पारदर्शकता नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
• या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून केळीला हमीभाव जाहीर करावा, बाजारात नियंत्रण ठेवावे आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
• अन्यथा, येणाऱ्या काळात केळी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो, मात्र आज त्याच कण्यावर आर्थिक संकटाचे ओझे वाढत चालले आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - धीरज शरद महाजन, केळी उत्पादक.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट शासनाने थांबवायला पाहिजे. बोर्ड भावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. व्यापाऱ्यांवर शासनाचा निर्बंध हवा आणि केळीला शासनाने हमी भाव नक्की करावा म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल. - सारंग पाटील, केळी उत्पादक.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
