Dasara Zendu Price Hike: राज्यात अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्याने झेंडूच्या दराने शंभरी ओलांडली आहे. दरम्यान अनेक व्यापारी ठोक स्वरूपात शेतकऱ्यांकडून खरेदी करून बाजारात फुलांची किरकोळ विक्री करतात. तिथे मात्र बाजारात चांगल्याच अधिक दराने ग्राहकांना फुले खरेदी करावे लागत असल्याने यंदा दारावरचे झेंडूच महाग झाले आहे.
झेंडू हे पीक दसरा आणि दिवाळी या सणांसाठी महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. मात्र, अतिवृष्टीने झेंडूच्या फुलांचे आणि झाडांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेली फुले सडून गेली आहेत.
८० रुपयांचा दर
मंगळवारी (दि.३०) लातूर बाजारात झेंडूचा ठोक दर ८० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलो दर होता. अतिवृष्टीमुळे फुलांचे उत्पादन घटल्याने बाजारातील आवक मंदावली आहे, याचा थेट परिणाम दरांवर झाला असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.
माझ्याकडे अर्धा गुंठे झेंडू आहे. पहिली तोड घटस्थापनेपूर्वी केली होती. त्याला केवळ ५० रुपये दर मिळाला होता. पावसामुळे फुले खराब झाल्याने कमी उत्पादन झाले असले तरी ठोक बाजारात शंभर रुपयांचा दर मिळाला आहे. - सूरज नागरगोजे, शेतकरी, दवणगाव जि. लातूर.
झेंडूची कमी आवक असल्याने दरात वाढ झाली आहे. दोन दिवसांत दुपटीने दर वाढले आहेत. दोन दिवस फुलांना मागणी राहणार असून आवक वाढली तर दर कमी होतील. - शिवाजी वाघमारे, व्यापारी.
दरवर्षी झेंडूची लागवड करतो. यंदा नेमके फुलांची उगवण होताना पावसाचा जोर वाढल्याने झेंडूचे केवळ २५ टक्केच चांगला माल निघाला आहे. एका एकरात पहिली तोडणी केवळ १५० किलो फुले निघाली आहेत. त्याला चांगला भाव मिळाला. यंदा अतिवृष्टीचा फटका झेंडूच्या शेतीला बसला आहे. - ज्ञानेश्वर घुटे, झेंडू उत्पादक, चाटा.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजची झेंडू आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
01/10/2025 | ||||||
जळगाव | --- | क्विंटल | 200 | 2000 | 4000 | 3000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 1878 | 3500 | 6000 | 4750 |
सातारा | --- | क्विंटल | 103 | 4000 | 6000 | 5000 |
राहता | --- | क्विंटल | 1 | 4500 | 4500 | 4500 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 27 | 3000 | 4000 | 3500 |
कामठी | लोकल | क्विंटल | 3 | 4070 | 4570 | 4320 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 5 | 3000 | 8000 | 4958 |
रामटेक | नं. १ | क्विंटल | 25 | 2200 | 2700 | 2500 |